७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 06:07 IST2025-05-24T06:07:30+5:302025-05-24T06:07:30+5:30

वैष्णवी हगवणे प्रकरण: पुण्यासह-साताऱ्यातूनही केला प्रवास, सीसीटीव्ही तपासल्यानंतर स्वारगेट परिसरातून आवळल्या मुसक्या

vaishnavi father in law and brother in law are finally arrested after 7 days both have been remanded in police custody till may 28 | ७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी (जि. पुणे) :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे याला पोलिसांनी शुक्रवारी सात दिवसांनंतर बेड्या ठोकल्या. या दोघांनाही शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एच. बारी यांनी दोघांना २८ मेपर्यंत ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी आत्महत्या केली. त्यानंतर, १७ मे रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही फरार होते. सात दिवस ते पोलिसांना चकवा देत होते. बावधन पोलिसांनी दोघांना शुक्रवारी पहाटे स्वारगेट परिसरातून अटक केली. दोघेही वेगवेगळ्या हॉटेलवर राहिले. त्यांनी आलिशान कारमधून प्रवासही केला. २२ मे रोजी रात्री ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले. मावळमधील एका हॉटेलमध्ये जेवण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यावेळी ते दोघे जण २३ मे रोजी पहाटे स्वारगेट येथे आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी दोघांना स्वारगेट येथून अटक केली. या प्रकरणातील सर्व पुरावे आम्ही गोळा केले आहेत, आम्ही लवकरच प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणार आहोत, असे पोलिस उपआयुक्त विशाल गायकवाड म्हणाले. 

दोन वर्षांपूर्वीही वैष्णवीकडून आत्महत्येचा प्रयत्न

वैष्णवी हगवणे हिने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने उंदीर मारण्याचे विष घेतले होते. वैष्णवीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याअनुषंगाने रुग्णालयातून उपचाराची कागदपत्रे मिळवण्यात आली आहेत.

आयजी जालिंदर सुपेकर यांच्यामुळे हिंमत वाढली

राज्याचे कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यामुळे हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली असून त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि रूपाली ठोंबरे-पाटील यांनी केली. सुपेकर हे वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणेचे मामा आहेत. त्यांच्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरू आहे. 

असा दिला पोलिसांना चकवा...

वैष्णवीचा मृतदेह औंध येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला गेला. त्यानंतर, १७ मे रोजी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हे एका कारमधून औंध रुग्णालयात आले होते. अटकेची कारवाई होऊ शकते, या भीतीने दोघांनी कार बदलली. थार कारमधून दोघांनी पलायन केले. 

सुरुवातीला ते बावधन येथील मुहूर्त लॉन्स येथे गेले. नंतर वडगाव मावळ येथे गेले. तेथून पवना धरण परिसरातील एका फार्म हाउसवर त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी थार कारमधून आळंदी येथे गेले.

१८ मे रोजी ते वडगाव मावळ येथे बंडू फाटक यांच्याकडे गेले. १९ तारखेला पुसेगाव येथील अमोल जाधव यांच्या शेतावर हे दोघेही गेले होते. त्यानंतर, पसरणीमार्गे कोगनोळी येथे १९ आणि २० तारखेला त्यांनी हॉटेल हेरिटेज येथे मुक्काम केला. त्यानंतर, २१ आणि २२ तारखेला प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर त्यांनी मुक्काम केला.

केस फास्ट्रॅकवर घेणार... 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबीयांची वाकड येथे शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ही केस फास्ट्रॅकवर घेण्याची विनंती मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. 

यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जातीने लक्ष देत आहेत. गुन्हा नोंद करण्यासाठी चालढकल केली असेल तर शहानिशा केली जाईल. यात कोणी कर्मचारी, अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या कुटुंबाने वैष्णवीची जाऊ मयुरी हिचाही छळ केला आहे. तिने अनेक मुलाखतीत छळाचा पाढा वाचला आहे. ते सगळे रेकॉर्डवर घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. 

वैष्णवीच्या पालकांशी चर्चा केली असता, चव्हाण नावाचा व्यक्तीचे नाव समोर आले आहे. त्याचा बंदुकीचा परवाना रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. त्याने बाळावर अत्याचार केल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

Web Title: vaishnavi father in law and brother in law are finally arrested after 7 days both have been remanded in police custody till may 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.