पिंपरी : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी पदाचा राजीनामा द्यावा, याबाबतच्या मागणीचा ठराव पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने केला आहे.
पिंपरीतील खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात बैठक झाली. शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले की, भारतीय राज्यघटनेला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याने काँग्रेससह इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी संसदेत राज्यघटनेवर चर्चेची मागणी केली. यावेळी इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सरकारला लोकशाही, संवैधानिक मूल्यांशी बांधिलकीची आठवण करून दिली. या विषयावर बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी संसद भवनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरले.वास्तविक भाजप व त्यांच्या विचारांचे लोक, संस्था डॉ. आंबेडकर व राज्यघटनेच्या विरोधात आहेत. याविरोधात काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडी घटकपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात संबंधित घटनेचा निषेध करून डॉ. आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा ठराव करण्यात आला आहे.