पिंपरी : पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. महापालिका निवडणुकीत हा गड राखण्यासाठी राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार गटांचे वेगवेगळे मेळावे मंगळवारी शहरात होणार आहेत. यानिमित्ताने दोघेही पवार काका - पुतणे शहरात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरावर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, २०१७मध्ये राष्ट्रवादीचा हा गड भाजपने उद्ध्वस्त केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. दरम्यान, अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार गट भाजपबरोबर गेला.
आता महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी दोन्ही राष्ट्रवादीचे मेळावे मंगळवारी होणार आहेत. शरद पवार गटाचा मेळावा ताथवडे येथे सकाळी अकराला होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. अजित पवार गटाचा मेळावा भोसरीत सायंकाळी चारला होणार आहे. त्यावेळी अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेशाचे कार्यक्रम
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात दाखल झालेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २८ जणांचा गट मंगळवारी पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत कोणीही भूमिका जाहीर केलेली नाही. दुसरीकडे अन्य पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे शरद पवार गटात प्रवेश होणार आहेत.