पिंपरी : मुंबई-पुणेमहामार्गावर आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकाजवळ आग लागून दोन दुकानांतील साहित्य खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. २७) दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घडली.
आकुर्डी येथे मुंबई-पुणेमहामार्गावरील तपस्वी प्लाझा या इमारतीजवळ दोन दुकाने होती. या दुकानांमध्ये दुपारी अचानक आग लागली. यात एक झेराॅक्सचे दुकान असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या झेराॅक्स दुकानाला लागून असलेल्या एका दुकानातील साहित्य देखील आगीत खाक झाले. याबाबत माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे मुंबई-पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्गालगत ही घटना घडल्यामुळे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहनांचा खोळंबा झाला होता. आगीत जिवीत हानी झाली नाही. तसेच आगीचे कारण समजू शकलेले नाही.