वडगाव मावळ परिसरातील दारुंब्रे गावात शेतामध्ये आढळली दोन बिबट्याची पिल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 16:52 IST2020-03-26T16:51:03+5:302020-03-26T16:52:58+5:30
मागील काही दिवसांपूर्वी सांगवडे गावांमध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळली होती.

वडगाव मावळ परिसरातील दारुंब्रे गावात शेतामध्ये आढळली दोन बिबट्याची पिल्ले
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथील शेतकरी दशरथ वाघुले यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. त्यावेळी उसाच्या पाचटाखाली त्यांना बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली.त्यांनी तात्काळ वन विभागाला याबाबत माहिती दिली. वडगाव मावळ वन विभागाचे अधिकारी तसेच कात्रज येथील वन विभागाचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वन परिक्षेत्र कार्यालयाच्या नियत क्षेत्र अधिकारी रेखा वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथील शेतकरी दशरथ वाघुले यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. बिबट्याच्या पिल्लांची वैद्यकीय तपासणी करून त्यानंतर त्यांना योग्य त्या ठिकाणी सोडून दिले जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी सांगवडे गावांमध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळली होती. त्यावेळी एका मादी बिबट्याने या दोन्ही पिलांना आपल्या सोबत नेले होते. त्यामुळे आज आढळलेली दोन्ही पिल्ले तीच असू शकतात. अथवा दुसरी असू शकतात. अशा दोन्ही शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात येत आहेत.