घरात घुसून गळ्याला चाकू लावत सोनसाखळी चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 10:33 IST2021-06-01T10:32:50+5:302021-06-01T10:33:05+5:30

तिघांचा विरोधात गुन्हा, एकाला अटक

Trying to break into a house and steal a gold chain | घरात घुसून गळ्याला चाकू लावत सोनसाखळी चोरी

घरात घुसून गळ्याला चाकू लावत सोनसाखळी चोरी

घरात घुसून महिलेची सोनसाखळी चोरी करण्यासाठी तिच्या गळ्याला चाकू लावला. यात महिलेला दुखापत झाली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. पांढरकर चाळ, आकुर्डी येथे सोमवारी (दि. ३१) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. 

शबनम शाहिद शाह (वय ३१, रा. मुंबई) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इकरमा सादिक बरमारे (वय १९, रा. वाशी, मुंबई), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सनी सिंग (वय २१, रा. वाशी, मुंबई), साहिब आबू हुरेरा चौधरी (वय २२, रा. वडाळा, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आकुर्डी येथे त्यांच्या माहेरी आल्या. पांढरकर चाळ, आकुर्डी येथे सोमवारी सकाळी फिर्यादी घरात असताना आरोपी संगनमत करून घरात घुसले. तसेच फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावला. फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करत असताना फिर्यादीच्या हाताच्या बोटाला चाकूने दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे तपास करीत आहेत.

Web Title: Trying to break into a house and steal a gold chain