प्रेमाचा त्रिकोण : लग्न झालेल्या प्रेयसीच्या पतीला मारण्यासाठी दिली पाच लाखांची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 08:00 PM2021-01-18T20:00:09+5:302021-01-18T20:00:25+5:30

शतपावली करणाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना सांगवी येथे ९ जानेवारी रोजी घडली होती.

Triangle of love: Five lakh betel nut given to kill the husband of a married girl friend | प्रेमाचा त्रिकोण : लग्न झालेल्या प्रेयसीच्या पतीला मारण्यासाठी दिली पाच लाखांची सुपारी

प्रेमाचा त्रिकोण : लग्न झालेल्या प्रेयसीच्या पतीला मारण्यासाठी दिली पाच लाखांची सुपारी

Next
ठळक मुद्देसांगवीतील गोळीबारप्रकरणी तीन आरोपींना पकडण्यात यश

पिंपरी : शतपावली करणाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना सांगवी येथे ९ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणाचे धागेदोरे औरंगाबाद व परभणीपर्यंत असल्याचे तपासात समोर आले असून त्याचा छडा लावण्यात सांगवी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक करून एकाला ताब्यात घेतले आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून ही घटना घडली असून, लग्न झालेल्या प्रेयसीच्या पतीला मारण्यासाठी मुख्य आरोपीने पाच लाखांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आणखी काही आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. 

जसप्रितसिंग अमरजितसिंग सत्याल (वय ३०, रा. औरंगाबाद), आनंद ऊर्फ दादुस मोहन इंगळे (वय २७, रा. उल्हासनगर), यांना अटक केली आहे. तर सुनील भगवान हिवाळे (वय २८, रा. ढसाळा, ता. सेलू, जि. परभणी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या ३० वर्षीय इसमाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी फिर्यादीची पत्नी आणि आरोपी जसप्रितसिंग यांचे प्रेमसंबंध होते. धर्म वेगळा असल्याने त्यांना लग्न करता आले नाही. दरम्यान आरोपी जसप्रितिसिंग याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. त्यामुळे जसप्रितसिंग याची परवानगी घेऊन त्याच्या प्रेयसीने लग्नाचा निर्णय घेतला. आरोपी जसप्रितसिंग आणि आपले प्रेमसंबंध आहेत, असे प्रेयसीने फिर्यादी यांना सांगितले. त्यानंतर फिर्यादी जसप्रितसिंग याच्या प्रेयसीसोबत विवाहबद्ध झाले. दरम्यान त्यांच्या लग्नापूर्वी त्यांना धमक्‍या देण्यात आल्या. लग्नानंतर काही जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. लग्नानंतर फिर्यादीच्या पत्नीने मोबाइल क्रमांक बदलले. मात्र तरीही जसप्रितसिंग तिच्या संपर्कात होता.   

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त आनंद भोईटे, सहायक आयुक्‍त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखली सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, राहिदास बोऱ्हाडे, अरुण नरळे, प्रवीण पाटील, नितीन खोपकर, शशिकांत देवकांत, विजय मोरे, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

सुपारीची रक्कम दिलेले बॅंक अकाऊंट होणार सीझ

आरोपी जसप्रितसिंग याने पाच लाखांची सुपारी दिली होती. त्यातील साडेचार लाख रुपये आरोपींच्या बॅंकेच्या खात्यावर ट्रान्सफर केले. ते अकाऊंट सीझ करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर आरोपींनी जीवे ठार मारण्यासाठी फिर्यादीवर ९ जानेवारी रोजी गोळीबार केला. मात्र फिर्यादी मोबाईलवर बोलत असल्याने गोळी मोबाईलला लागून त्यांच्या मानेतून आरपार गेली. याप्रकरणी पोलिसांनी औरंगाबाद व उल्हासनगर, ठाणे येथे शोध घेऊन आरोपींना पकडले. आरोपी हिवाळे याने रावळकर नावाच्या व्यक्तीचा फोन घेऊन त्यावरून फिर्यादीला धमकी दिली होती. पोलिसांनी रावळकर यांना साक्षीदार केले आहे.   

शस्त्रे कुठून आणली?
याप्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. आणखी काही आरोपींच्या मागावर पोलीस आहेत. लवकरच त्यांना पकडण्यात येईल. त्यांनी शस्त्र, हत्यार कुठून आणले, त्याचा कोणी पुरवठा केला याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तसेच याप्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

Web Title: Triangle of love: Five lakh betel nut given to kill the husband of a married girl friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.