भाजीपाल्याचा कचरा म्हणून गांजाची वाहतूक; पोलिसांनी पकडला ३१ किलो गांजा
By नारायण बडगुजर | Updated: October 31, 2023 18:51 IST2023-10-31T18:51:18+5:302023-10-31T18:51:51+5:30
हिंजवडी पोलिसांनी सोमवारी (दि. ३०) सापळा लावून कारवाई करत ३१ किलो गांजा पकडला. याप्रकरणी दोघांना अटक केली....

भाजीपाल्याचा कचरा म्हणून गांजाची वाहतूक; पोलिसांनी पकडला ३१ किलो गांजा
पिंपरी : भाजीपाल्याचा कचरा आहे, असे म्हणत टेम्पोमधून गांजाची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंजवडी पोलिसांनी सोमवारी (दि. ३०) सापळा लावून कारवाई करत ३१ किलो गांजा पकडला. याप्रकरणी दोघांना अटक केली.
मैनुद्दीन अब्दुल सत्तार (२३, रा. हिंजवडी. मूळ रा. बिहार), बिपलभ बिधन राणा (२४, रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार रवी पवार यांना माहिती मिळाली की, वाकडकर वस्ती येथे एक व्यक्ती टेम्पोमधून गांजा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी वाकडकर वस्ती येथे सापळा लावला. वाकड ब्रिजकडून संशयित टेम्पो आला असता त्याला बाजूला घेऊन चौकशी केली.
सुरुवातीला टेम्पो चालकाने टेम्पोमध्ये भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली. त्यामध्ये गांजाचे १७ पुडे आढळून आले. ३१ किलो १०० ग्राम गांजा आणि टेम्पो असा एकूण १४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. टेम्पो चालक आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ, पोलिस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक अजितकुमार खटाळ, सहायक फौजदार महेश वायबसे, पोलिस अंमलदार संतोष डामसे, रवी पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.