खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांना रिक्षा परवाना जमा करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:00 IST2025-01-07T16:59:43+5:302025-01-07T17:00:24+5:30

नोकरी करत असताना ही रिक्षा परवाना असणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कारवाई केली जाणार आहे.

Those working in private or government jobs will have to submit a rickshaw license. | खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांना रिक्षा परवाना जमा करावा लागणार

खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांना रिक्षा परवाना जमा करावा लागणार

पिंपरी : शहरात नोकरी करणाऱ्या अनेकांकडे रिक्षा परवाना (परमिट) असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता खासगी अथवा सरकारी नोकरी करत असाल आणि तुमच्याकडे रिक्षा परमिट असेल तर ते ३१ जानेवारीपर्यंत परत करावे लागणार आहे. नोकरी करत असताना ही रिक्षा परवाना असणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कारवाई केली जाणार आहे.

शहरात नागरिक सार्वजनिक व खासगी वाहनाचा वापर करतात. पिंपरी शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या पुढे आहे. नागरिकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन विभागाकडून खासगी वाहतुकीसाठी रिक्षाला परमिट दिले जाते. मोटार व्हेईकल अॅक्टनुसार हे परवाने दिले जातात. लोकसंख्या वाढल्यामुळे त्या प्रमाणत रिक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओकडून नवीन रिक्षांना परवाने देण्यास २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. रिक्षा परवाने देण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकांना व्यवसाय मिळाला. अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले. त्यामुळे रिक्षांमध्येदेखील स्पर्धा निर्माण झाली. पिंपरी चिंंचवड शहरात ४० हजार रिक्षा परवाने दिले आहेत. शहरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार ऑटोरिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत नसल्याची अट आहे. रिक्षा परवाना देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात येते. तरीही शहरात काही जण नोकरी करून शिल्लक वेळेत रिक्षा चालवित असल्याच्या तक्रारी येत आहेत. रिक्षा परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्या व्यक्तींनी त्यांचा रिक्षा परवाना स्वेच्छेने परत करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी येत्या ३१ जानेवारीपर्यंत रिक्षा परवाना परत करावा. त्यानंतर आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे.

पुणे आरटीओ विभागाने पुणे जिल्ह्यासाठी एक आदेश जारी केला आहे. यात खासगी सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत असतील त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत रिक्षा परवाना प्रादेशिक परिवहन विभागाकडे जमा करायचा आहे. - राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

 

Web Title: Those working in private or government jobs will have to submit a rickshaw license.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.