पिंपरी : एकीकडे शहरात शबनम न्यूज वेब चॅनलचा प्रतिनिधी आहे, असे भासवत चोऱ्या करणारे दोन तोतया पत्रकार वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अडीच लाखांच्या किमतीचे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. नसीम सादिक उस्मानी (वय ३२, रा. थेरगाव) आणि मोहमद शराफत हुसेन अली (वय २४, रा. थेरगाव, मूळ बिजानोर, उत्तर प्रदेश) अशी चोरट्यांची नावे आहेत. परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम आणि मोहमद हे शबनम न्यूज या वेब चॅनलमध्ये पत्रकार असल्याचे सांगत शहरात फिरत होते. त्यांच्याकडे शबनम न्यूजचे ओळखपत्र, तसेच इतरही विविध सामाजिक संघटनांची नियुक्ती पत्रे पोलिसांना आढळून आली आहेत. वाकडमध्ये एका सोनसाखळी चोरी प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरी करणारा शबनम न्यूज या वेब चॅनलशी संबंधित प्रतिनिधी असल्याचे समजले. नसीम सादिक उस्मानी असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता या दोघांनी वाकडमध्ये तीन आणि सांगवी परिसरात दोन चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथक प्रमुख हरीष माने, विक्रम कुदळे, विजय गंभीरे, अशोक गायकवाड, श्याम बाबा, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, बिभीषण कन्हेकरकर, अनिल महाजन, दादा पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली. ..................पत्रकार नियुक्त करताना तसेच वेब न्यूज पोर्टल, तसेच साप्ताहिक वृत्तपत्रांच्या मालक, संपादकांनी संबंधित व्यक्तीची माहिती घेतली पाहिजे. कोणालाही पत्रकार म्हणून नियुक्त केले जात असल्याने असले प्रकार घडू लागले आहेत. पत्रकार असल्याचे ओळखपत्र त्यांच्याजवळ असते. शिवाय अन्य संघटनांचे पदाधिकारी असल्याचीही नियुक्तीपत्र असतात. अशा नियुक्तीपत्रांचा त्यांना पाहिजे त्या वेळी ते सोयीस्कर रित्या गैरवापर करतात, हे या घटनेतून निदर्शनास आले असून, या प्रकारांना आळा घालण्यासाठी नियुक्तीपत्र देताना दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.
चोऱ्या करणारे तोतया पत्रकार पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 20:49 IST
नसीम आणि मोहमद हे शबनम न्यूज या वेब चॅनलमध्ये पत्रकार असल्याचे सांगत शहरात फिरत चोऱ्या करत होते.
चोऱ्या करणारे तोतया पत्रकार पोलिसांच्या जाळ्यात
ठळक मुद्देअडीच लाखांचे ८ तोळ्यांचे दागिने जप्त