क्राईम पेट्रोल बघून केलेला दरोड्याचा कट फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 09:49 PM2019-08-16T21:49:55+5:302019-08-16T21:51:44+5:30

कर्ज फेडण्यासाठी दराेड्याचा बनाव केला. पाेलिसांनी ताे हाणून पाडत आराेपींना केली अटक.

they made daukoti plan by watching crime petrol but fails | क्राईम पेट्रोल बघून केलेला दरोड्याचा कट फसला

क्राईम पेट्रोल बघून केलेला दरोड्याचा कट फसला

Next

पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोल मालिका बघून लाखो रुपये चोरण्याचा कट रचला. मात्र पोलिसांनी तो बारा तासातच हाणून पाडला. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. १४) घडलेल्या दरोड्याचा घटनेत फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. देहूरोड पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दोघांकडून ३४ लाख ३९ हजार ४६३ रुपयांची रोकड जप्त केली. 

कुणाल रविंद्र पवार (वय २०), ओंकार उर्फ मोन्या बाळासाहेब भोगाडे (वय २१, दोघे रा. हनुमान कॉलनी, हुतात्मा चौक, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल याने काही खासगी बँकामधून कर्ज घेतले होते. तसेच पैशांची उधळपट्टी करण्याची सवय असल्याने त्याला पैशांची चणचण भासू लागली. तो लॉजीकॅश कंपनीमध्ये काम करतो. ही कंपनी मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या संस्थांकडून पैसे जमा करते आणि ते पैसे बँकेत जमा करते. या कंपनीत काम करत असल्याने त्याने क्राईम पेट्रोल ही मालिका बघून दरोडा टाकण्याचा कट रचला. 

बुधवारी कुणाल याने भोसरी, दिघी, नाशिक फाटा, पिंपळे सौदागर, पिंपरी, चिंचवड, देहूगाव व देहूरोड येथून कंपनीची कॅश गोळा करुन ताथवडे येथे जात होता. त्यावेळी एक काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून अंगामध्ये निळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या एका अज्ञात व्यक्तीने पिस्तुलाचा धाक दाखवून कुणालकडे जमा झालेली ३३ लाख ३० हजार ४६४ रुपये जबरदस्तीने घेऊन गेला. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंदवला. यामध्ये कुणाल यानेच फिर्याद दिली.

गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा पाचच्या पोलिसांनी केला. पोलिसांनी कुणालकडे झालेल्या घटनेबाबत चौकशी केली असता त्याच्या माहितीमध्ये तफावत आढळली. पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास केला असता कुणाल पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे निष्पन्न झाले. तपासात कुणाल याच्यासोबत त्याचा मित्र ओंकार त्याला देहूरोड येथे भेटल्याचे आढळले. पोलिसांनी ओंकारला ताब्यात घेऊन कसून चौकशी करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पोलिसांनी दोघांकडून ३३ लाख ३० हजार ४६४ रक्कमेपैकी ३३ लाख २४ हजार ४६३ रुपये रक्कम, गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दोन मोटार सायकल (एम एच १४/ एफ क्यु २४९४),  (एम एच १४ / एफ झेड ५३८१) व ३ मोबाईल असा एकुण ३४ लाख ३९ हजार ४६३ रुपयांचा माल जप्त केला आहे.

Web Title: they made daukoti plan by watching crime petrol but fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.