शरद पवार गटात १९९५ ची पुनरावृत्ती होणार नाही; सुनील तटकरेंची थेट प्रतिक्रिया
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 21, 2024 19:52 IST2024-02-21T19:50:34+5:302024-02-21T19:52:54+5:30
सुनिल तटकरे म्हणाले, माझे बंधू अनिल तटकरे हे मला सोडून गेले असे म्हणणे योग्य होणार नाही...

शरद पवार गटात १९९५ ची पुनरावृत्ती होणार नाही; सुनील तटकरेंची थेट प्रतिक्रिया
पिंपरी : अजित पवार गटाने बहुमतावर जो निर्णय घेतला. त्यामुळे १९९५ च्या इतिहासाची पुनरावृत्ती घडेल, असे म्हणणे अजिबात योग्य होणार नाही. कधी-कधी इतिहासाची पुनरावृत्ती होत नसते, तर इतिहास घडत असतो. त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्यावर वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. देशात भाजपची सत्ता येणार असे आमचे वरिष्ठच आम्हाला सांगत होते, असा सूचक इशारा देखील सुनील तटकरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा मेळावा निगडीत झाला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.
सुनिल तटकरे म्हणाले, माझे बंधू अनिल तटकरे हे मला सोडून गेले असे म्हणणे योग्य होणार नाही. ते २०१४ पासूनच शिवसेना आणि इतर वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षात जावं, तो त्यांचा निर्णय आहे, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
तिकिट वाटपासंदर्भात चर्चा नाही...
महायुतीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात अजून कोणतीही चर्चा झाली नाही. महायुतीतील अजित पवार गटाला मिळणाऱ्या लोकसभेच्या जागे संदर्भातील विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत, असे म्हणत त्यांनी जागा वाटप बद्दल केलेले विरोधकांचे दावे सुद्धा खोडून काढले.