निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो मुंबई पुरता; संजय राऊतांची स्पष्ट भूमिका
By विश्वास मोरे | Updated: January 27, 2025 17:44 IST2025-01-27T17:42:44+5:302025-01-27T17:44:19+5:30
स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली असा अर्थ काढणे चुकीच आहे

निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो मुंबई पुरता; संजय राऊतांची स्पष्ट भूमिका
पिंपरी : लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलो. विधानसभेमध्ये आम्ही हरलो, त्याची कारणे काय आहेत सर्वांना माहीत आहेत. पण, तरीही या पराभवाने खचून न जाता आगामी आणि इतर निवडणुकांना आम्ही सामोरे जात आहोत. या निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो केवळ मुंबई पुरता आहे, अशी भूमिका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवडमध्ये शहरात आले असता राऊत बोलत होते.
म्हणजे महाविकास आघाडी संपुष्टात, असा अर्थ काढणे चुकीचा!
राऊत म्हणाले, ''स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली असा अर्थ काढणे चुकीच आहे. मुंबई वगळता पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर शहरात एकत्र लढण्याचा सर्वांचाच विचार आहे. त्या त्या शहरातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून आम्ही तिथला निर्णय घेऊ.''
त्यांना पर्यायही नव्हता!
आमदारांचा मान राखून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. यावर संजय राऊत म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांचे भाजप हाय कमांड आहे. आणि हाय कमांडने त्यांना आदेश दिला तो त्यांना मानावा लागला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हायकामांचा आदेश मानला. त्याच हाय कमांडचा शिंदे यांनी आदेश पाळला. त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता. उपमुख्यमंत्री पद स्वीकारला नसतं, तर त्यांनी काय केलं असतं? आपली कातडी वाचवण्याशिवाय , पुढचे खटले थांबवण्यासाठी, पुढे होणार त्रास होऊ नये यासाठी त्यांना सरकार मध्ये जाणे भाग होते, ते गेले. ज्या पद्धतीने मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडली गेली त्याच पद्धतीने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही पक्ष तोडला जाईल, भाजपला पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. ते देशातही पक्ष तोडतील. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचाही पक्ष ते तुटतील. मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना राऊत म्हणाले, 'मनोज जरांगे हे लढवय्ये नेते आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
त्यांनी काय पकोडे तळावेत का?
आयटी क्षेत्रात आपण प्रगती केली असली तरी मोजक्या जागांसाठी हजारो इंजिनियर लाईन लावतात. यावरून बेरोजगारी किती आहे, हे स्पष्ट होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढावी. साडेपाच हजार आयटी कर्मचारी नोकरीसाठी रांगेत उभे राहतात. त्यांनी काय पकोडे तळावेत का?'
जातोय पण त्याला उत्तर नाही!
दोन्ही ठाकरे एकत्र येतात का? यावर संजय राऊत म्हणाले, 'हा प्रश्न गेली २५ वर्ष विचारला जातोय पण त्याला उत्तर नाही, आम्ही महाविकास आघाडी मध्ये आहोत शिवसेनेची एक भूमिका आहे जे पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशी हात मिळवणी करतील त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही.'
विरोधकांना पकडायचे? यात त्यांचा हातखंडा
नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत, स्वतःच्या लोकांना सोडायचे आणि विरोधकांना पकडायचे? यात त्यांचा हातखंडा आहे.'