शिवसेनेला किती जागा हे आत्ताच ठरविण्याचे कारण नाही; लोकसभेच्या जागांवरून पाटलांचे स्पष्टीकरण
By विश्वास मोरे | Updated: March 19, 2023 18:24 IST2023-03-19T18:24:39+5:302023-03-19T18:24:55+5:30
भाजपने केलेली निवडणूकीची तयारी शिवसेनेला उपयोगी पडणार

शिवसेनेला किती जागा हे आत्ताच ठरविण्याचे कारण नाही; लोकसभेच्या जागांवरून पाटलांचे स्पष्टीकरण
पिंपरी : भारतीय जनता पक्ष मागील काही महिन्यापासून विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागांसाठी निवडणुकीची तयारी करत आहे. त्यात शिवसेनेला किती जागा जातील हे आतापासून ठरवण्याचे कारण नाही. आमची तयारी शिवसेनेला उपयोगी पडेल, असे स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरीत दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर पालकमंत्री आले होते. त्यांनी, पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या शंकरराव मासुळकर हेल्थकेअर सेंटर आणि आय हॉस्पिटलच उद्घाटन केलं त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
महाविकास आघाडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचे सूतावोच केले आहे. तर भाजपनेही निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेस किती जागा मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. त्याविषयी पाटील यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेला किती जागा जातील हे आतापासून ठरवण्याचे कारण नाही. आमची तयारी शिवसेनेला उपयोगी पडेल,असे सांगितले.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पालकमंत्री पाटील म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी तीन अतिशय उच्च अशा आयएएस अधिकाºयाची समिती नेमली आहे. तरी देखील अत्यावश्यक सेवेतील संपकरी हे देखील संपात सहभागी झाले आहेत. मात्र हा काळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षांचा असल्याने तसेच रुग्णांचे मोठया प्रमाणात हाल होत असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं.’’