पिंपरी: केंद्र सरकारच्यास्वच्छ भारत अभियानांतर्गत झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ झाले. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा आणि राज्यात पहिल्यांदाच पहिला क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. यासोबतच, ७ स्टार कचरामुक्त शहर (गार्बेज फ्री सिटी) आणि वॉटर प्लस सिटी या प्रतिष्ठेचे मानांकनही शहराने कायम ठेवले आहे. शहरात कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाटीची प्रक्रिया नियमितपणे पार पाडली जाते. तसेच स्वच्छतेत नागरिकांचाही सहभाग मोलाचा ठरला असल्याचे आयुक्त शेखर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी सचिव श्रीनिवास कटिथिली, सचिव रुपा मिश्रा, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे शहरात कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाटीची प्रक्रिया नियमितपणे पार पडत आहे. प्रत्येक प्रभागात ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा केला जातो. कचरा हस्तांतरण केंद्राजवळ प्रक्रिया विभाग, कचरा विलगीकरण, बायोगॅस यंत्रणा आणि पुनर्वापर प्रकल्प कार्यरत आहेत. तसेच मलनिस्सारण व्यवस्थेतही शहराने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता, नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण आणि जल पुनर्वापर या बाबतीत शहराने इतरांसाठी आदर्श घालून दिला आहे.