मोरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश
By Admin | Updated: February 29, 2016 00:49 IST2016-02-29T00:49:21+5:302016-02-29T00:49:21+5:30
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ या वर्षासाठी सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या

मोरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश
रावेत : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ या वर्षासाठी सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात सुवर्णपदक प्रदान केले जाणार आहे.
यामध्ये एम. एस्सी वनस्पतीशास्त्र विषयाची अनुपमा राज या विद्यार्थिनीस त्यागमूर्ती श्रीमती सरस्वती रामचंद्र शेलार सुवर्णपदक, तर अश्विनी जाधव या विद्यार्थिनीस ह.भ.प. योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार ऊर्फ शेलारमामा सुवर्णपदक जाहीर झाले आहे. अनुपमास संशोधन आणि समाजकार्याची आवड असून, जैवविविधता जतन आणि संरक्षणासाठी ती जाणीव जागृतीचे काम करते. वृक्षलागवड, संवर्धन, ग्रामीण भागामध्ये जनावरांना लसीकरण, शेतकऱ्यांमध्ये शेतामधील कीटकनाशकांचा वापर, शेती कर्ज योजना या विषयी जाणीव जागृतीचे काम ती उत्साहाने करीत असते.
अश्विनी ही एमए मराठीची विद्यार्थिनी असून, गड-किल्ले संरक्षणासाठी काम करीत असून, विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी ती प्रयत्न करते. तिची आकाशवाणीवर निवेदिका म्हणून निवड झाली आहे.
दोन्ही विद्यार्थिनींना सुवर्णपदक मिळणे हे महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानस्पद असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
तिला वनस्पती विभागशास्त्राच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही मुलींनी परिश्रम घेतल्याने त्यांनी यश मिळविले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)