तळेगाव दाभाडे : येथील वैष्णव शैलेश काकडे याने वयाच्या सतराव्या वर्षी पीएच.डी. ही पदवी मिळवली आहे. त्याने भौतिकशास्त्रात केनेडी युनिव्हर्सिटी, सेंट लुसिया विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळविली आहे.
डॉ. वैष्णव काकडे याने भौतिकशास्त्रातील क्वांटम रिलॅटिव्हिटी कॉन्सेप्ट्स यावर केलेल्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्याबद्दल युनिव्हर्सल रेकॉर्ड्स फोरमने ‘वर्ल्ड्स यंगेस्ट अस्पायरिंग फिजिसिस्ट,’ तर नासाने ‘गॅलॅक्टिक प्रॉब्लेम सॉल्व्हर’ म्हणून गौरविले आहे. परंतु इतक्यावरच न थांबता डॉ. वैष्णव याने ‘ॲस्ट्रोब्रेन’ या संस्थेची स्थापना करून अंतराळविज्ञान आणि विज्ञान शिक्षणाला सामाजिकत्वाशी जोडले आहे. या यशाबद्दल भारत गौरवरत्न सन्मान आणि रतन टाटा नॅशनल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड २०२५ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. या यशामागे अथक परिश्रमांइतकीच त्याच्या कुटुंबाची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषतः आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच उत्तुंग झेप घेतली असल्याचे तो सांगतो.
विज्ञान, अध्यात्म आणि समाजकार्य यांचा एकत्रित संगम साधत त्याने अनेक तरुणांच्या मनात स्वप्नांची ज्योत प्रज्वलित केली आहे. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि कुटुंबाचे सहकार्य एकत्र आले, तर वय हा यशाचा सर्वांत छोटा घटक ठरतो. हे वयामध्ये न अडकता जग बदलण्याचे बळ देणारे हे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.