पवना नगर : मावळ तालुक्यातील पवन मावळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. कळपाने हिंडणाऱ्या कुत्र्यांपासून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पवना नगर परिसरातील येळसे, कडधे, काले, पवना नगर चौक व पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे कळपाने हिंडताना दिसतात. परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते शिळे अन्न रस्त्यावर टाकत असल्याने या परिसरात भटके कुत्रे ठाण मांडून असतात. कुत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कुत्रे येणाऱ्या- जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जातात. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात पकडलेले भटके कुत्रे पवन मावळ परिसरात आणून सोडले जात असल्याचे सांगत ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रानटी कुत्र्यांमुळेही शेतकऱ्यांमध्ये भीती
पवन मावळ परिसरातील डोंगर रांगांमध्ये रानटी कुत्रेही मोठ्या कळपाने हिंडताना दिसून येतात. त्यांच्याकडूनही पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत. डोंगर रांगांमध्ये हिंडणाऱ्या रानटी कुत्र्यांची संख्याही जास्त असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.