अतिक्रमण निर्मूलनच्या पथकावर भिरकावला दगड; वाकड येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 16:55 IST2021-03-23T16:54:20+5:302021-03-23T16:55:13+5:30
पाच जणांवर गुन्हा दाखल

अतिक्रमण निर्मूलनच्या पथकावर भिरकावला दगड; वाकड येथील प्रकार
पिंपरी : अतिक्रमण निर्मूलन कारवाई दरम्यान महापालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच एका महिलेने पथकाच्या दिशेने दगड भिरकावला. दत्तमंदिर रोड, वाकड येथे सोमवारी (दि. २२) ही घटना घडली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश सुदेशकुमार कांबळे (वय २९, रा. रावेत) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर शरद वाघमारे (रा. दत्तमंदिर रोड, वाकड), त्याच्या दोन बहिणी आणि अन्य दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात कार्यरत आहेत. ते त्यांच्या सहकारी आणि वरिष्ठांसोबत दत्तमंदिर रोड, वाकड येथे शरद वाघमारे यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच अतिक्रमण निर्मूलन कारवाई करणाऱ्या पथकाच्या दिशेने एका महिलेने दगड भिरकावला.