Pimpri Chinchwad: सासू-सासऱ्यांना मारहाण केल्याने जावयावर गुन्हा दाखल; पिंपरी-चिंचवडमधील घटना
By नारायण बडगुजर | Updated: June 17, 2023 14:47 IST2023-06-17T14:46:46+5:302023-06-17T14:47:17+5:30
रहाटणी येथे १ जून रोजी तसेच काळेवाडी येथे १३ जून रोजी हा प्रकार घडला...

Pimpri Chinchwad: सासू-सासऱ्यांना मारहाण केल्याने जावयावर गुन्हा दाखल; पिंपरी-चिंचवडमधील घटना
पिंपरी : मद्यपी पतीने पत्नीला तसेच सासू सासऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीआरपीसी कलम ४१(१)(अ) अन्वये मद्यपीला नोटीस बजावली. रहाटणी येथे १ जून रोजी तसेच काळेवाडी येथे १३ जून रोजी हा प्रकार घडला.
असद इसराक खान (वय २६, रा. रहाटणी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. असद खान याच्या पत्नीने याप्रकरणी शुक्रवारी (दि. १६) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती असद खान हा घरात दारू पित होता. मला भूक लागली आहे, खायला घेऊन ये, असे असद खान याने पत्नीला सांगितले.
त्यानुसार फिर्यादी पत्नी खायला करायला गेल्या. त्यावेळी असद खान याची आई त्याच्या खोलीत गेली असता आईने असद खान याला दारू पिताना बघीतले. त्याच्या आईला त्याच्या पत्नीनेच त्याच्या खोलीत पाठवले, असे असद खान याला वाटले. त्या कारणाने असद खान याने पत्नीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच १३ जून रोजी रात्री दीडच्या सुमारास असद खान हा त्याच्या पत्नीच्या आईवडिलांच्या घरी आला. माझ्यासोबत चल, असे तो पत्नीला म्हणाला.
त्याच्यासोबत जाण्यास पत्नीने नकार दिला. त्यावेळी असद खान याने पत्नीला व तिच्या वडिलांना मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी पत्नीची आई आली असता त्यांनाही असद याने धक्का मारला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक रोहित दिवटे तपास करीत आहेत.