पिंपरी : पुणे जिल्ह्यात गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला ९६ किलो गांजासह अटक करण्यात आली. पुणे-नाशिक रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. संजय पांडुरंग मोहिते (वय ३९, रा. कंरजगाव, ता. मावळ), मन्साराम नुरजी धानका (४०, रा. हुरेपाणी, धुळे) व एका महिला आरोपीला पोलिसांनीअटक केली आहे.
पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त यांनी शहर व परिसरात कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी सूचित केले आहे. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड व पोलिस अंमलदार निखिल वर्पे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन चारचाकी वाहनांमध्ये गांजा या अमली पदार्थाची वाहतूक होणार आहे. ही वाहने रोहकल फाटा येथून जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पुणे-नाशिक रस्त्यावर रोहकल फाटा येथे (एमएच ०३ एएम ८१८३ व एमएच १८ बीआर ३४४२) ही दोन चारचाकी वाहने ताब्यात घेतली. त्या वाहनामधील संशयितांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे सहा पांढऱ्या रंगाची गांजा असलेली पोती सापडली. त्यांच्याकडून ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा, ३ फोन, २ चारचाकी वाहने व रोख रक्कम असा एकूण ६३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहायक पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलिस अंमलदार प्रदीप शेलार, किशोर परदेशी, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, निखिल वर्पे, कपिलेश इगवे, मितेश यादव, चिंतामण सुपे, सुनील भागवत, महादेव बिक्कड व तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे यांच्या पथकाने केली.
सराईत गुन्हेगाराचा समावेशयामध्ये अटक केलेल्या संजय पांडुरंग मोहिते यावर यापूर्वी दोन ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. कामशेत पोलिस स्टेशन व लोणी काळभोर याठिकाणी गांजा बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.