Smart card of Maharashtra State Road Transport Corporation in fall down on road | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्मार्ट कार्ड बेवारस

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे स्मार्ट कार्ड बेवारस

ठळक मुद्देचिंचवडमधील प्रकार, ५५ स्मार्ट कार्ड सापडले रस्त्यावरपरिवहन मंडळाच्या या भोंगळ कारभारावर नागरिक संतप्त शासकीय योजनेत या स्मार्ट कार्ड मुळे जेष्ठ नागरिकांना बस प्रवासात ५० टक्के सवलत

पिंपरी -चिंचवड : शासनाच्या योजनांची काठी हातात यावी यासाठी राज्यातील अनेक जेष्ठ नागरिक प्रतीक्षेत असतात.उतारवयात जीवनाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मिळणाऱ्या स्मार्ट कार्डसाठी तासनतास रांगेत उभे राहून ही मंडळी कार्डच्या प्रतीक्षेत असतात.मात्र हे स्मार्ट कार्ड रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडल्याचे वास्तव चिंचवडमध्ये समोर आले आहे.परिवहन मंडळाच्या या भोंगळ कारभारावर नागरिक संतप्त व्यक्त करीत आहेत.
जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या एसटी प्रवासात सवलत मिळावी या साठी स्मार्ट कार्ड ही संकल्पना सुरू केली.या साठी जेष्ठ नागरिकांची प्रत्येक केंद्रावर झुंबड उडाली. प्रवासात सवलत घेण्यासाठी हे कार्ड महत्वाचे असल्याने नागरिक तासंतास रांगेत उभे राहून अर्ज करीत होते. यासाठी होणारी गर्दी पाहता हे कार्ड काढण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती.हे स्मार्ट आपल्या हातात येतील अशी अपेक्षा जेष्ठ नागरिकांना लागली आहे.
मात्र चिंचवड गावातील रस्त्यावर ५५ जेष्ठ नागरिकांचे हे स्मार्ट कार्ड अस्तव्यस्त पडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.सागर सुरेश जंजाळे हे शनिवारी सांयकाळी आकुडीर्तून चिंचवड गावाकडे जात असताना चिंचवड वाहतूक शाखा कार्यालयाच्या पुढे काही कार्ड रस्त्यावर अस्तवस्त पडल्याचे निदर्शनास आले.त्यांनी हे सर्व कार्ड जमा केले.हे कार्ड महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने देण्यात येणारे जेष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड असल्याचे लक्षात आले.
हे कार्ड सत्यप्रत असल्याने त्यांनी हे कार्ड चिंचवड पोलीस स्टेशनकडे जमा केले.चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम यांनी याची खातरजमा करून या बाबत संबंधित विभागाशी संपर्क केला.या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड स्थानक प्रमुख पी.व्ही पाटील यांनी संबंधीत कर्मचा?्यांना चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये पाठवून या बाबत खातरजमा केली.हे महत्वाचे स्मार्ट कार्ड असल्याने पोलिसांनी या बाबत दखल घेत ते स्थानक प्रमुखांच्या हावाली केले.
शासकीय योजनेत या स्मार्ट कार्ड मुळे जेष्ठ नागरिकांना बस प्रवासात ५० टक्के सवलत मिळते.या साठी हे कार्ड महत्वाचे आहे.मात्र या कार्ड बाबत शासन स्तरावर राबविण्यात येणारी यंत्रणा कुचकामी असल्याचे समोर आले आहे.जेष्ठ नागरिकांचे हे ५५ स्मार्ट गहाळ झाल्याने महामंडळाचा हा कारभार अनागोंदी पद्धतीने होत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.
----------

Web Title: Smart card of Maharashtra State Road Transport Corporation in fall down on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.