चांगल्या परताव्याच्या आमिषाने साडेसहा कोटींचा गंडा; ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्सूशन्स कंपनीच्या मालकांसह एजंटवर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Updated: December 24, 2023 17:37 IST2023-12-24T17:36:58+5:302023-12-24T17:37:51+5:30
कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले

चांगल्या परताव्याच्या आमिषाने साडेसहा कोटींचा गंडा; ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्सूशन्स कंपनीच्या मालकांसह एजंटवर गुन्हा दाखल
पिंपरी : कंपनीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले. मात्र, परतावा किंवा मुद्दल रक्कम परत न करता सहा कोटी ६५ लाख ३४ हजार ३१० रुपयांचा अपहार केला. निगडीतील भक्तीशक्ती चौक येथील ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्सूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत २१ डिसेंबर २०२१ ते २३ डिसेंबर २०२३ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
सनील बगाराम जाधव (३४, रा. आकुर्डी रेल्वे स्थानकजवळ, निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष अंकुशराव चव्हाण (रा. निगडी), संकेत भागवत (रा. दापोडी), दीपक शिंदे (रा. चऱ्होली) यांच्यासह एका संशयित महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिला आणि संतोष चव्हाण हे ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्सूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आहेत. तसेच संशियत संकेत भागवत आणि दीपक शिंदे हे कंपनीचे एजंट आहेत. कंपनीचे मालक आणि एजंट यांनी आपआपसांत संगणमत करून फिर्यादी जाधव व इतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादी जाधव व इतर गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवूणक केलेली एकत्रित रक्कम सहा कोटी ६५ लाख ३४ हजार ३१० रुपयांचा अपहार केला. फिर्यादी जाधव यांची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी जाधव यांच्या तक्रारीनुसार निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.