चाकूचा धाक दाखवत पळविली उबेरची गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:05 IST2018-05-23T14:05:29+5:302018-05-23T14:05:29+5:30
आरोपींनी चालकाला चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने खाली उतरविले व मोटारीसह ते फरार झाले.

चाकूचा धाक दाखवत पळविली उबेरची गाडी
पिंपरी : प्रवाशी म्हणुन आलेल्या महिलांना वाकड येथे मोटारीत बसवून उबेर मोटार चालकाने स्वप्ननगरी येथे सोडले. महिलांना मोटारीतून खाली उतरवित असताना दुचाकीवरून तीनजण आले. त्यातील दोघांनी चालकाला मोटारीतून बाहेर काढले. त्याला शिवीगाळ करुन चाकूचा धाक दाखवत मोटारीसह आरोपींनी पलायन केले. ही घटना बुधवारी रात्री पावणेएकच्या सुमारास घडली. याप्रकरणी चालक सौरव दिलीप देशमुख (वय २३, रा.हडपसर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील भूमकर चौकात काही महिला स्वप्ननगरीत जायचे आहे, असे सांगून मोटारीत बसल्या.या महिला स्वप्ननगरी येथे मोटारीतून उतरल्या. त्याचवेळी तेथे एका दुचाकीवरून अज्ञात तीनजण आले. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. आरोपींनी चालकाला चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने खाली उतरविले व मोटारीसह ते फरार झाले. चालकाने ओढवलेल्या प्रसंगाला तोंड देत १०० नंबरवरून पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी अज्ञात तीन आरोपींविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.