धक्कादायक ! भाजी सांडल्याने १० वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पिंपरी-चिंचवड शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 19:27 IST2020-07-21T19:26:11+5:302020-07-21T19:27:11+5:30
टॅक्सी ड्रायव्हर असलेले वडील घरी आल्यानंतर त्यांना मुलगा बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

धक्कादायक ! भाजी सांडल्याने १० वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पिंपरी-चिंचवड शहरातील घटना
पिंपरी : भाजी सांडल्याने वडील रागावले. त्यामुळे १० वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली. चिखली येथील मोरेवस्ती येथे मंगळवारी (दि. २१) दुपारी अडीचच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
वेंकटेश लक्ष्मण पुरी, असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील लक्ष्मण महादेव पुरी (रा. श्रीकुंज हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, पिंपरी-चिंचवड, मूळ रा. इंगेगाव, ता. परळी, जि. बीड) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वेंकटेश याचे वडील लक्ष्मण पुरी हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत. तर आई धुणीभांडीचे काम करते. सोमवारी (दि. २०) भाजी सांडल्याने वडील रागावले. त्याचा वेंकटेश याला राग आला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी त्याची आई व वडील घराबाहेर गेले. त्यानंतर वेंकटेश व त्याची तीन वर्षांची लहान बहीण घरात होते. दुपारी अडीचच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर मुलगा बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने बाथरूमच्या भिंतीवर चढून छताला ओढणीने स्वत:ला लटकवून घेतले, असे लहान मुलीने वडिलांना सांगितले.
पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वेंकटेश हा आकुर्डी येथील महात्मा फुले इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. सहायक पोलीस निरीक्षक शाम म्हस्के तपास करीत आहेत.