पिंपरी : शिवशाही बसचे सातत्याने होणारे अपघात, ब्रेकडाऊन लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवशाही बसची विशेष तपासणी विशेष अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. गुरुवार (दि. २६) पासून चार दिवसांच्या आत तपासणी करून ४ जानेवारीच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर यांनी दिले आहेत.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या ७९२ शिवशाही आहेत. प्रवाशांना गारेगार प्रवासाचे स्वप्न दाखवून एसटी महामंडळाने ८ वर्षांपूर्वी ‘शिवशाही’ बस भाडेतत्त्वावर घेतल्या. मात्र, आता या बसची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बसचे अपघात वाढले आहेत. तसेच ब्रेकडाऊन प्रमाणदेखील वाढले आहेत. बसमधील एसी बंद, सीट कव्हर आणि पडदे अस्वच्छ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वातानुकूलित बसच्या नावाखाली नागरिकांकडून जास्त पैसे घेऊनही चांगल्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाढते अपघात आणि तक्रारीच्या अनुषंगाने महामंडळाने प्रत्येक विभागातील सर्व शिवशाही वाहनांची विशेष तपासणी करण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. २६ डिसेंबरपासून या बसची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी किमान २ ते कमाल ४ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी, उणिवा, त्याकरिता कशाप्रकारे उपाययोजना करता येतील आदींबाबतचा तपासणी अहवाल संबंधित विभागास व मुख्य कार्यालयास ४ जानेवारी पूर्वी ई-मेलद्वारे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.