मौजमजेसाठी दरोड्याचा प्लॅन आखून लुटली सात लाखांची रोकड; बनाव करणाराच निघाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 09:01 PM2021-09-04T21:01:02+5:302021-09-04T21:01:52+5:30

२४ तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या

Seven lakh cash was theft by plotting a robbery for fun | मौजमजेसाठी दरोड्याचा प्लॅन आखून लुटली सात लाखांची रोकड; बनाव करणाराच निघाला आरोपी

मौजमजेसाठी दरोड्याचा प्लॅन आखून लुटली सात लाखांची रोकड; बनाव करणाराच निघाला आरोपी

Next

पिंपरी : वाहनचालक व एक जण कंपनीची रोकड घेऊन जात असताना पाच जणांनी अडवून मारहाण केली. तसेच सात लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. रोकड चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या वाहनचालकासह तीन आरोपींना २४ तासांत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून साडेचार लाखांची रोकड हस्तगत केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.    

यश गणेश आगवणे (वय १९, रा. रुपीनगर, तळवडे), कासीम मौला मुर्शिद (वय २१), सागर आदिनाथ पवार (वय १८, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) आणि अभिषेक शिरसाठ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिरसाठ हा साई स्टील ट्रेडर्स या कंपनीत चालक म्हणून कामाला होता. दरम्यान, बुधवारी (दि. १) रात्री कंपनीचे पैसे घेऊन जात असताना चिंचवड येथे पाच अज्ञात इसमांनी मारहाण करीत त्याच्याकडील सात लाख तीन हजार ६५० रुपये असलेली बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी अज्ञात इसमांवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

दरोडा विरोधी पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. आशिष शिरसाठ याच्या बोलण्यात तफावत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे शिरसाठ याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. दरम्यान, शिरसाठ याचे मित्र चिखली येथील एका बेकरीच्या मागे असून त्यांनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे आणि कर्मचारी आशिष बनकर यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपी आगवणे, मुर्शिद आणि पवार या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख ४५ हजारांची रोकड आणि एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. त्यांनी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.   

दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक मंगेश भांगे, कर्मचारी आशिष बनकर, नितीन लोखंडे, महेश खांडे, राहुल खारगे, उमेश पुलगम, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, गणेश कोकणे, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, सागर शेडगे, राजेश कौशल्ये यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 
 
कर्ज, मौजमजेसाठी केला गुन्हा  
आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे असून उसनवारी घेतलेल्या पैशांचे त्यांच्यावर कर्ज होते. तसेच त्यांना मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे कंपनीचे पैसे लुटायचे, असा प्लॅन आरोपींनी केला. कंपनीचा वाहनचालक अभिषेक शिरसाठ हा या कटात सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातून मिळणाऱ्या पैशांमध्ये जास्त हिस्सा आरोपी शिरसाठ याला देण्याचे ठरले होते. आरोपी मुर्शिद आणि आगवणे हे सराईत गुन्हेगार आहेत. मुर्शिद याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे आहेत. तर, आगवणे याच्यावर निगडी येथे यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.

Web Title: Seven lakh cash was theft by plotting a robbery for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.