नगर अर्बन बँकेच्या कर्ज अपहारप्रकरणी सात जणांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 13:32 IST2021-11-09T13:17:10+5:302021-11-09T13:32:57+5:30
पिंपरी: नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत झालेल्या २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी तत्कालीन संचालकांसह इतर काही जणांवर चिंचवड ...

नगर अर्बन बँकेच्या कर्ज अपहारप्रकरणी सात जणांची चौकशी
पिंपरी: नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत झालेल्या २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी तत्कालीन संचालकांसह इतर काही जणांवर चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशीसाठी १२ जणांना बोलावण्यात आले होते. त्यातील सात जण सोमवारी (दि. ८) चौकशीसाठी हजर राहिले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास आहे. त्यांनी समज पत्र बजावून अहमदनगर येथील १२ जणांना चौकशीसाठी बोलविले होते. त्यामध्ये अनिल चंदुलाल कोठारी, अजय अमृतलाल बोरा, दिलीप अमलोकचंद गांधी, संजय पोपटलाल लुणिया, साधना नंदकुमार भंडारी, मनीष दशरथ साठे, विजयकुमार मिश्रिलाल मंडलेचा, सचिन दिलीपराव गायकवाड, केदारनाथ मुरलीधर लाहोटी, सुहास शिवाजी वखारे, संदीप इश्वरदास वाघमारे, श्रीकांत गोपीनाथ गुदडे यांचा समावेश आहे.
यातील सात जणांनी चौकशीला हजेरी लावली, तर चौकशीसाठी नंतर हजर राहणार असल्याचे काही जणांनी पोलिसांना कळविले आहे. तसेच काही जणांनी वैद्यकीय कारण देऊन चौकशीला टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. अहमदनगर येथील १२ जणांना चौकशीसाठी बोलाविले होते. त्यातील सात जण आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होते, असे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या नगर अर्बन बँकेचे १८ संचालक निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये सोमवारी अर्जांची छाननी झाली. ज्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले त्यापैकी काहीजण सत्ताधारी पॅनलमधील उमेदवार आहेत. त्यांचे अर्ज वैध झाले, मात्र दुसरीकडे चौकशीला समोरे जावे लागले. त्यामुळे बँकेच्या वर्तुळात या चौकशीचीही चर्चा होती.