राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 14:41 IST2022-12-08T14:40:44+5:302022-12-08T14:41:00+5:30
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीचे विधान केले. त्यांचे धाडस तरी कसे होते?

राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा; अन्यथा महाराष्ट्र बंद, संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा
पिंपरी : बारा बलुतेदार आणि बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणारा हा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अवमान केला जात आहे. राज्यपालांनी एकदा नव्हे तर दोन वेळा असे केले. त्यामुळे वेळ आली आहे ॲक्शन घेण्याची, राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा, अन्यथा महाराष्ट्र बंद होईल, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेध करीत विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी बंदचे आवाहन करण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ संभाजीराजे छत्रपती पिंपरी येथे आले होते. त्यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांनी राज्यपालांचा निषेध करत सरकारला इशारा दिला.
संभाजीराजे म्हणाले, महाराष्ट्र हे इतर राज्यांना दिशा देणारे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. मात्र, महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांबाबत आपण चर्चा करत बसलो आहोत. त्यामुळे आपण एकत्र येऊन आपला आवाज दिल्लीपर्यंत पोचविण्याची गरज नाही का? म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये हे आंदोलन होत आहे. राज्यपाल कोशारी यांनी महाराजांचा दोनवेळा अवमान केला. त्यांची हिम्मत होतेच कशी, त्यानंतरही काही लोकं त्यांना सपोर्ट कशी करतात, हा मोठा प्रश्न आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आणखी इतर चार जणांनी महाराजांबाबत चुकीचे विधान केले. त्यांचे धाडस तरी कसे होते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला
सांगण्यात आलं की, आपला निरोप आम्ही पोहचवला. काय निरोप पोहचवला तुम्ही, सांगा ना काय निरोप पोहचवला? ज्या-ज्या ठिकाणी निरोप पोहचवायचा आहे तेथे आम्ही निरोप पोहचवणार, कुठल्या ठिकाणी निरोप पोहचवायचा आहे ते सांगा, हे तर सांगा की काय निरोप पोहचवला? तुम्ही हा निरोप पोहचवला का की, महाराष्ट्रातून कोशारींची हकालपट्टी व्हायला पाहिजे, असा प्रश्न जाहीरपणे करून संभाजीराजे छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
प्रत्येक शहरातील आंदोलनात सहभागी होणार
राज्यपालांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन होत राहणार आहे. प्रत्येक शहरातील आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहे. पिंपरी-चिंचवड हे उद्योगांचे शहर आहे. या शहरातून सुरू झालेल्या आंदोलनाचा हा प्रवास महाराष्ट्र ‘बंद’च्या दिशेने सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यपालांना लवकर महाराष्ट्राबाहेर पाठवा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.