IAS Pooja Khedkar: कर बुडवला! खेडकरांच्या मालकीच्या थर्मोव्हेरिटा कंपनीवर जप्ती; पिंपरी महापालिकेची कारवाईचा
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: July 19, 2024 13:07 IST2024-07-19T13:04:35+5:302024-07-19T13:07:08+5:30
खेडकर कुटुंबियांच्या मालकीची थर्मोव्हेरिटा ही कंपनी रेडझोन मध्ये असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२२ पासून कर थकविला आहे

IAS Pooja Khedkar: कर बुडवला! खेडकरांच्या मालकीच्या थर्मोव्हेरिटा कंपनीवर जप्ती; पिंपरी महापालिकेची कारवाईचा
पिंपरी : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर असलेली कंपनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून जप्त होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांच्या नावावर पिंपरी चिंचवडमध्ये थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीवर पालिकेकडून जप्तीची कारवाई होणार आहे. या कंपनीने पालिकेचा कर बुडवला आहे. त्याप्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ज्योतिबानगर तळवडे येथे मनोरमा खेडकर यांची थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे २ लाख ७७ हजार इतकं कर मागील दोन वर्षापासून बुडविला आहे. तसेच थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खेडकर कुटुंबीयांनी रेड झोनमध्ये उभारली आहे. त्यामुळे खेडकर कुटुंबीयांची ही कंपनी देखील अनधिकृत असल्याचे शिक्कामोर्तब पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला आहे. पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी या कंपनीचा पत्ता आपले निवासस्थान म्हणून दाखवला होता.
खेडकर कुटुंबियांच्या मालकीची थर्मोव्हेरिटा ही कंपनी रेडझोन मध्ये आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२२ पासून कर थकविला आहे. या कर थकविणाऱ्या कंपनीवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. - प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका