सांगवी : पोलिसांना हक्काच्या जागेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:47 IST2018-08-13T01:46:58+5:302018-08-13T01:47:16+5:30
विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी असा सुमारे २५ चौरस किलोमीटरचा परिसर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत येत आहे व सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या पोलीस स्टेशनला अजूनही हक्काच्या जागेची प्रतीक्षा आहे.

सांगवी : पोलिसांना हक्काच्या जागेची प्रतीक्षा
सांगवी : विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी असा सुमारे २५ चौरस किलोमीटरचा परिसर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत येत आहे व सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या पोलीस स्टेशनला अजूनही हक्काच्या जागेची प्रतीक्षा आहे.
सांगवी पोलीस स्टेशन २००८ मध्ये सुरू झाले. सांगवी पोलीस स्टेशनअंतर्गत तीन पोलीस चौकी असून, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी आणि नवी सांगवी पोलीस चौकी अशा तीन पोलीस चौक्या अंतर्गत आहेत. येथे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, अकरा सहायक पोलीस उपनिरीक्षक, सतरा हवालदार, चाळीस पोलीस नाईक, ४९ पोलीस असा एकूण १३० पोलीस आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये ३० महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी आहेत. अंदाजे २५ चौरस किलोमीटर परिसरात सांगवी पोलीस स्टेशनची हद्द असून, सांगवीत औंध हा सगळ्यात कमी अंतर तर जगताप डेअरी पिंपळे सौदागर हा जास्त अंतर असलेला परिसर या पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. महिला स्वतंत्र कक्ष नाही. तक्रारदार व संबंधित पोलीस स्टेशनशी कागदपत्रे तसेच पासपोर्टसाठी येणाºया नागरिकांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था दिसून येत नाही. पोलीस स्टेशनमध्ये येणाºया नागरिक व कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने शिस्त लावणाºया पोलीस दलाची वाहने रस्त्यावर लावल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. पोलीस स्टेशन व समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानात अनेक वर्षांपासून जप्त केलेल्या वाहनांचा खच लागला असून, येथे झुडपे, डास, दुर्गंधी यामुळे नागरिकांना त्रास होत असून, आरोग्यासाठी घातक असल्याने जप्तीतील व नोटीस देऊनही न नेलेली वाहने येथून हटवण्यात यावीत अशी मागणी आहे.
सांगवी पोलीस स्टेशनमध्ये आजही बाहेरून फिल्टर पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. पोलीस कर्मचारी संख्येच्या मानाने पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या विविध गुन्ह्यांत, अपघातात जप्त करण्यात आलेली दुचाकी व चारचाकी वाहने पडून आहेत. आत प्रखर वीज दिवे नसून बाहेरील भागातही वीज दिवे लावले नसल्याने अंधार असतो, तर उन्हाळ्यात पुरेसे विद्युत पंखे व थंड हवेचे कूलर नसल्याने पोलीस कर्मचाºयांना त्रास सहन करावा लागतो. दोन चारचाकी, तर तीन मोटारसायकल अशा तोडक्या वाहनसंख्येच्या जोरावर सुसाट अत्याधुनिक वाहनांच्या मदतीने गुन्हा करणाºया गुन्हेगारांना पोलीस दल पकडणार कसे, हा प्रश्न आहे. एक चारचाकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासाठी, एक बंदोबस्तासाठी, तर तीन मोटरसायकल दिवस-रात्र परिसरात गस्त घालणाºया मार्शलसाठी आहेत. गुन्ह्यात अटक अथवा पकडून आणण्यात आलेल्या आरोपींना तात्पुरत्या कोठडीची जागा नसून सहायक पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये एका बाजूला आरोपींना कोंडून ठेवण्यात येते.
मानसिक स्वास्थ्य : रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
सदर पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रहिवासी गृहनिर्माण सोसायटी असून, येथील रहिवाशांना पोलीस स्टेशनचा त्रास होतो. आरोपींना होणारी मारपीट, आरडाओरडा, दिवस-रात्र वाहनांची वर्दळ आदी गोष्टी रहिवाशांचे स्वातंत्र्य व शांतता हिरावून घेत असून, मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहेत.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड विधानसभा पोलीस स्टेशन संदर्भात वेळोवेळी स्वतंत्र जागेची मागणी करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवड येथील पोलीस आयुक्तालय होण्याअगोदर ही मागणी मी केली होती व त्या संदर्भात प्रश्न मांडला होता. संबंधित पोलीस स्टेशनसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आॅफिस व इतर पर्याय तपासून पाहिले जात असून, त्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, लवकरच सांगवी पोलीस स्टेशनला स्वतंत्र जागा देण्यात येईल.’’
पुरेशा व सुरक्षित जागेचा अभाव
गुन्ह्यातील आवश्यक व इतर कार्यालयीन कागदपत्रे ठेवण्यासाठी पुरेशा व सुरक्षित जागेचा अभाव असून, महत्त्वाची कागदपत्रे असुरक्षित दिसून येतात. सांगवी पोलीस स्टेशन महापालिकेच्या एकूण आठ शटर असलेल्या दुकानवजा आॅफिसमध्ये सुरू असून, १५० चौरस प्रतिदुकानाच्या अशा आठ गळ्यांमध्ये पोलीस स्टेशन असून हक्काची जागा उपलब्ध होण्यासाठी प्रतीक्षेत आहे.