ग्राहकांकडून आलेली रक्कम उडवणारा ‘सेल्समन’ जेरबंद; ३ वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

By नारायण बडगुजर | Published: April 2, 2024 05:43 PM2024-04-02T17:43:52+5:302024-04-02T17:44:18+5:30

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी त्याला पुणे परिसरातून अटक केली...

'Salesman' jailed for embezzling money from customers; Gungara was giving police for 3 years | ग्राहकांकडून आलेली रक्कम उडवणारा ‘सेल्समन’ जेरबंद; ३ वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

ग्राहकांकडून आलेली रक्कम उडवणारा ‘सेल्समन’ जेरबंद; ३ वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

पिंपरी : बांधकाम व्यावसायिकांकडे ‘सेल्समन’ म्हणून काम करत ग्राहकांकडून आलेली रक्कम घेऊन पसार होणाऱ्या ठगास पोलिसांनी जेरबंद केले. तो तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी त्याला पुणे परिसरातून अटक केली.

साइमन रॉनी पीटर (४०, रा. उंड्री पिसोळी, कात्रज बायपास, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट एककडून समांतर तपास केला जात होता. एका गुन्ह्यातील संशयित साइमन पीटर हा बांधकाम व्यावसायिकांकडे ‘सेल्स मॅनेजर’ म्हणून नोकरी करायचा व ग्राहकांकडून रोख स्वरूपात आलेली लाखो रुपयांची रक्कम घेऊन पसार होत असे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.

साइमन पीटर हा तीन वर्षांपासून पिंपरी - चिंचवड आणि पुणे शहर पोलिसांना गुंगारा देत होता. तो सतत आपली राहण्याची ठिकाणे बदलत होता. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे आणि अजित रुपनवर यांनी साइमन पीटर याचा माग काढला. तांत्रिक विश्लेषण करून त्याचा ठावठिकाणा शोधला. त्यानंतर पोलिसांनी उंड्री पिसोळी, कात्रज बायपास येथून त्याला ताब्यात घेतले. साइमन याच्यावर २०२२ मध्ये तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्याने हिंजवडी, हडपसर, पिरंगुट या परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलिस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर, नागेश माळी, पोपट हुलगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: 'Salesman' jailed for embezzling money from customers; Gungara was giving police for 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.