RTE Admission| पोर्टल ठप्प असल्याने आरटीई प्रवेशाचा खोळंबा! पालकांची वाढली चिंता
By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: April 18, 2023 17:11 IST2023-04-18T17:11:15+5:302023-04-18T17:11:55+5:30
ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आणि ऑनलाइन सर्व्हरमध्ये अनेक त्रुटी...

RTE Admission| पोर्टल ठप्प असल्याने आरटीई प्रवेशाचा खोळंबा! पालकांची वाढली चिंता
पिंपरी : आरटीईचे सर्व्हरही चालेना, वेबसाइट संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पाल्यांचा प्रवेश होईल की नाही, अशी चिंता पालकांना सतावत आहे. शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत शासनामार्फत या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून घेतले जात आहेत.
मात्र, या ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आणि ऑनलाइन सर्व्हरमध्ये अनेक त्रुटी आहेत. सर्व्हर संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे. याशिवाय त्यामध्ये अनेक अडचणीदेखील येत आहेत. त्यामुळे प्रशासन आमच्या भावनांशी खेळत आहे का, असा सवालही पालक उपस्थित करत आहेत.
प्रवेश पडताळणी समितीचा निर्णय महत्त्वाचा-
निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. या पडताळणी समितीने कागदपत्रे योग्य असल्याचा शेरा दिल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. योग्य कागदपत्रांअभावी पडताळणी समितीने अपात्र शेरा दिल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार आहे. मात्र, सर्व्हर चालत नसल्याने अलॉटमेंट लेटरच पालकांना मिळत नाही. त्यामुळे पालकांना प्रवेशाची चिंता सतावत आहे.
अलॉटमेंटसाठी पालक त्रस्त -
अर्ज करण्याच्या प्रक्रियेत पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेबसाइटसुद्धा मेसेज आल्यानंतर दोन दिवस बंदच होती. नवीन वेबसाइटही संथ गतीने सुरू आहे. सायबर कॅफेचालक वेबसाइट संथ असल्याकारणाने जादा रुपये घेतात. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास होत आहे.
- एक पालक
आरटीई संक्षिप्तमध्ये -
शहरातील एकूण जागा : ३ हजार २२५
शहरातील एकूण शाळा : १७२
प्रवेशासाठी आलेले अर्ज : ११ हजार २३५
ज्या पालकांना प्रवेशाचे मेसेज आले आहेत, त्यांनी अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून कागदपत्रांची पडताळणी केंद्रावर पडताळणी करावी. सर्व्हर काही प्रमाणात संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये.
- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, महापालिका