निवासनिश्चितीत अडकले आरटीईचे प्रवेश, पालकांना अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 01:52 IST2019-03-20T01:52:07+5:302019-03-20T01:52:18+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातून ४० हजार २६० अर्ज आले आहेत.

निवासनिश्चितीत अडकले आरटीईचे प्रवेश, पालकांना अडचणी
- प्रकाश गायकर
पिंपरी - शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातून ४० हजार २६० अर्ज आले आहेत. अर्ज भरताना आपल्या स्वत:च्या घराचे स्थान दाखविण्यासाठी रहिवासी पुराव्यावरील पत्ता व शाळा आणि घराचे रेखांश, अक्षांश यांचाही विचार करावा लागतो. मात्र नकाशामध्ये घराचे निश्चित स्थान मिळत नसल्याने आरटीईचे अर्ज भरताना पालकांना अडचणी येत आहेत.
२५ टक्के मोफत प्रवेशाचे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी ५ मार्चला सुरुवात झाली. यासाठी पालकांना विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरताना विविध किचकट बाबींची पूर्तता करावी लागत आहे. पाल्ल्यांचे आरटीईचे अर्ज भरत असताना स्वत:चे घराचे स्थान रहिवासी पुराव्यावरील पत्ता पाहूनच नकाशात स्थान निश्चित करावे लागते. त्यासाठी गूगल नकाशावर घराचे लोकेशन ‘बलून’ राहत्या घरावरच दर्शवावा लागतो. जोपर्यंत आपल्या निवासस्थानावर बलूनचे चिन्ह येत नाही, तोपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
सध्या अर्ज भरताना घराचे
अचूक निशाण गूगल नकाशावर आढळून येत नाही. अर्ज भरताना
घराचे व शाळेचे अंतरही महत्त्वाचे समजले जाते. मात्र अक्षांस व
रेखांश शोधण्यास अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घराचे निश्चित स्थान गूगलवर दिसत नाही. त्यामुळे अर्ज भरताना अडचणी येत आहेत.
अॅपद्वारे १४३ अर्ज
जिल्ह्यातून आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील ९६३ शाळा पात्र आहेत. तर १६ हजार ६१९ जागा भरण्यात येणार आहेत. ५ मार्चपासून आजपर्यंत ४१ हजार ७३५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १४३ अर्ज मोबाइल अॅपद्वारे भरण्यात आले आहेत. तर ४१ हजार ५९२ अर्ज आॅनलाइन भरले आहेत.
अर्जासाठी उरले तीन दिवस
आरटीई प्रवेशासाठी पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता ५ मार्चपासून २२ मार्चची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकांकडे अवघे तीन दिवस उरले आहेत. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी दूर करून या तीन दिवसांमध्ये अर्ज भरावा लागणार आहे.