खोटी कागदपत्र देऊन बँक अध्यक्षानेच केली पावणेतीन कोटींची फसवणूक; पिंपळे निलख येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 19:43 IST2021-02-16T19:43:11+5:302021-02-16T19:43:32+5:30
दहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल : व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल

खोटी कागदपत्र देऊन बँक अध्यक्षानेच केली पावणेतीन कोटींची फसवणूक; पिंपळे निलख येथील प्रकार
पिंपरी : पिंपळे निलख येथील श्री छत्रपती अर्बन बँक को ऑपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्ष तथा माजी नगरसेवकाने कर्मचाऱ्यांना हाताशी धरत बनावट कागदपत्राच्या आधारे कर्ज घेतले. यात बँकेची तब्बल २ कोटी ६९ लाख ८३ हजार ८५५ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दहा जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक विलास एकनाथ नांदगुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र मोहन बारटक्के, रवींद्र सोनवणे, बँक अधिकारी गायत्री सुहास देशपांडे, रोखपाल हेमलता प्रकाश नांदगुडे, स्मिता कदम, कर्जदार ज्ञानदेव बबन खेडकर, रामलिंग केदारी, तेजस जाधव, यशवंत जगन्नाथ पाटील अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत संगणमत करुन खोटी आणि बनावट कागदपत्रे श्री छत्रपती अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या विशालनगर येथील शाखेत सादर केली. बँकेच्या कर्ज आणि ठेवींमध्ये गैरव्यवहार करुन खोटे आणि बनावट हिशेब नोंदविले. त्याद्वारे २ कोटी ६९ लाख ८३ हजार ८५५ रुपये स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी घेतले. स्वत:च्या फायद्यासाठी गुन्हेगारी स्वरुपाचा कट करुन बँकेचे सभासद, ठेवीदार, निबंधक यांचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भगवान तुकाराम बोत्रे (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे.