वडगाव मावळ : भाजपाने उमेदवारी डावलल्याने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुनील शेळके हे नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन मुंबईत किंवा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी शेळके यांची जाहीर होईल.अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून शेळके यांनी स्वखर्चातून तालुक्यात विविध विकास कामे केली. यावेळी विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी वर्षभरापासून प्रयत्न केले होते. भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे नाव न आल्याने शेळके यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. परंतू दुस-या यादीत बाळा भेगडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शेळके नाराज झाले. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून अशी चर्चा सुरू झाली आहे. या बाबत सुनील शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आज नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असून कार्यकर्त्यांची विचार नियमय करून कोणता झेंडा खांद्यावर घ्यायचा की अपक्ष लढायचे याचा निर्णय घेतला जाईल.
मावळमध्ये भाजपात बंडखोरी ; सुनील शेळके समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 11:44 IST