राजेंद्र हगवणेला सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 08:20 IST2025-05-23T08:19:57+5:302025-05-23T08:20:43+5:30
वैष्णवीच्या वडिलांचे फोनवरून केले सांत्वन; म्हणाले... वेळीच कल्पना दिली असती तर मी जरूर लक्ष घातले असते, माझा काय दोष?

राजेंद्र हगवणेला सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी (पुणे) : अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (२३) यांच्या आत्महत्या प्रकरणी वेगवेगळ्या बाबी समोर येत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी राजेंद्र हगवणेला सोडणार नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करीत पक्षाचा हगवणेला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.
अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांंनी वैष्णवीचे माहेरच्या कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी फोनवरून वैष्णवी हिचे वडील आनंद ऊर्फ अनिल कस्पटे यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केले. यावेळी वैष्णवीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले.
अजित पवार म्हणाले, ‘आपल्या मुलीचे त्या मुलाशी लव्ह मॅरेज झाले होते, तरीही तिला सासरच्यांनी त्रास दिला. तुम्ही कोणीही मला कधीच याबाबत सांगितले नाही. तसे सांगितले असते तर आपण वेळीच त्यात लक्ष घातलं असतं. मी पोलिस आयुक्तांना फोन करून सर्व संशयितांना अटक करण्याची सूचना केली आहे. आपल्या सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं. नालायकांना मुलीला नांदवायचे नव्हते तर तिला माहेरी पाठवून द्यायचे होते. लव्ह मॅरेज कशाला करतात?’
बारामती येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, की एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्यांच्या सुनेने काही वेडेवाकडे केले तर त्याच्याशी माझा काय संबंध? मी दोषी असेन तर फासावर लटकवा. पण उगीचच माझी का बदनामी करता?
...हा नीचपणाचा कळस उद्योगमंत्री उदय सामंत
फरार असलेल्या दोन संशयितांना पोलिस काही तासांत अटक करतील. अशा नीच प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी संतप्त भावना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. मी, पोलिस आणि शासन देखील कस्पटे कुटुंबीयांसोबत आहेत, असे म्हणत त्यांनी वैष्णवीच्या आई-वडील आणि नातेवाइकांचे सांत्वन केले.
...हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’: तृप्ती देसाई
आधी जमिनीसाठी लुटणारा मुळशी पॅटर्न आपण बघितला आहे. आता मुलींचा छळ करणारा मुळशी पॅटर्न समोर आला आहे. इतका पैसा देऊनही श्रीमंत घरातील लोक सुनांचा छळ कसा करू शकतात, असा प्रश्न उपस्थित करून भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या संस्थापक प्रमुख तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त केला. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करून त्यांची गुंडांप्रमाणे पोलिसांनी धिंड काढावी, असेही त्या म्हणाल्या.
...हकालपट्टी
मुळशीचे राजेंद्र हगवणे आणि त्यांचे चिरंजीव सुशील यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याचे पत्र जारी केले.
दादा, तुम्ही बोलला होतात...
वैष्णवीचे वडील फोनवरून अजित पवारांना म्हणाले, ‘तरी दादा तुम्ही बोलला होतात की, ही गाडी हगवणेंनी मागितली की, तुम्ही स्वखुशीने दिली. त्यावर मी म्हणालो की, स्वखुशीने दिली आहे.’
हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेने छळाबाबत सहा महिन्यांपूर्वीच महिला आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र, आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात येत आहे. मात्र, यात कुचराई किंवा हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, संशयितांना कडक शिक्षा होण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल - आदिती तटकरे, मंत्री.
वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. हुंडाविरोधी कायदा असतानाही या विकृतीच्या विरोधात लढलेच पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून राज्य महिला आयोग कडक भूमिका घेत आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही आग्रह धरला आहे. महिला आयोगाच्या वतीने आम्ही निश्चितच पाठपुरावा करणार आहोत. - रूपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग