पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनचालक परवान्यांचा कोटा झाला दुप्पट; एका दिवसात मिळणार ११२ जणांना लायसन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 19:49 IST2020-06-27T19:45:32+5:302020-06-27T19:49:42+5:30
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात वाहन चालविण्याच्या परवान्यांना मोठी मागणी

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनचालक परवान्यांचा कोटा झाला दुप्पट; एका दिवसात मिळणार ११२ जणांना लायसन्स
पिंपरी : लॉकडाऊन शिथील झाल्याने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात आले. वाहन चालविण्याचे शिकाऊ २१ तर पक्के ४९ परवाने एका दिवसात देण्यात येत होते. मात्र सोमवारपासून (दि. २९) हा कोटा दुप्पट केला असून, शिकाऊ ४२ तर पक्के ७० परवाने एका दिवसात देण्यात येतील.
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात वाहन चालविण्याच्या परवान्यांना मोठी मागणी आहे. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सुरक्षेची काळजी घेत परवान्यांचे कामकाज केले जात आहेत. लॉकडाऊनपूर्वी एका दिवसात साडेतीनशेपर्यंत वाहन परवाने देण्यात येत होते. लॉकडाऊनमुळे आरटीओचे कामकाज बंद झाले. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मर्यादित स्वरुपात कामकाज सुरू झाले. त्यानंतर वाहन परवाने देण्यात आले. मात्र त्यासाठी 'अपॉंइन्मेन्ट' घेणे अनिवार्य केले. २२ जून ते २६ जून या सहा दिवसामध्ये ९८ नवीन वाहन चालक परवान्यासाठी अर्ज आले. ती संख्या वाढविण्यासाठी वाहन परवान्याचा कोटा वाढविण्यात आला आहे.
पुण्यात सुरक्षेचा आढावा घेणार
पुणे आरटीओकडून एका दिवसात २८५ शिकाऊ आणि पक्के परवाने देण्यात येत होते. या कामकाजाचा तसेच सुरक्षेचा आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. उपलब्ध मनुष्यबळ याचाही यावेळी विचार केला जाणार आहे. त्यानंतर वाहन परवान्यांचा कोटा वाढविण्यात यावा किंवा नाही याबाबत निर्णय होईल, अशी माहिती पुण्याचे प्रादेश्कि परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
............................
वाहन परवाना चाचणीसाठी घ्यावयाची दक्षता
- दोन अर्जदारांमध्ये सहा फुटाचे अंतर असावे
- प्रत्येक चाचणीनंतर संगणक तसेच की-बोर्ड सॅनिटाईज करणे
- कार्यालयात प्रवेशासाठी मास्क व हँडग्लोज अनिवार्य
- प्रत्येक उमेदवाराच्या चाचणीनंतर ड्रायव्हिंग स्कूल चालकांनी वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे
............
सुरक्षिततेचे निकष पाळून उपलब्ध मनुष्यबळात कामकाज सुरळीत होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे. वाहन चालक परवान्यांची मोठी मागणी आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना करून परवान्यांचा कोटा सोमवारपासून दुप्पट केला आहे.
विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड