पिंपरी : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) प्रदेशाध्यक्षाच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली. याप्रकरणी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे याच्यासह इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने २६ ऑक्टोबर रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला भाजपाची पदाधिकारी आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी प्राधिकरण), अनिता कृष्णा तिपाले, एकविरा शरीफ खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे व जयेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेल्या होत्या. दरम्यान, बंगल्याबाहेर संशयितांनी आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तू येथे का आलीस? तुला मारून टाकू. तू एकटी राहतेस, अनुप मोरेने तुला मारून टाकायला सांगितले आहे. तुला अपघातात गाडीने उडवू, आमचे आमच्या दादावर खूप प्रेम आहे. तुला बदनाम करून जगणे मुश्किल करू. अनुप मोरे हा आमचा बाप आहे, तो आम्हाला सांभाळून घेईल, असे म्हणत धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी महिला पुन्हा बंगल्यात परत गेली.
त्यावेळी एक व्यक्ती कार घेऊन फिर्यादी महिलेला सोडायला आला असता, अनेक महिलांनी फिर्यादी महिलेच्या गाडीला घेराव घातला. फिर्यादी महिला तक्रार देण्यासाठी चिंचवड पोलिस ठाण्यात गेली असता, अनिता तिपाले व एकविरा खान यांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. तक्रार नोंदवून पोलिस ठाण्याच्या बाहेर येताच फिर्यादी महिलेला पुन्हा शंभर जणांच्या टोळक्याने धमकी दिली. तुला मारून टाकू असे त्यांनी धमकावले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील तपास करत आहेत.
पोलिस म्हणतात.. अनावधानाने राहिले नाव
पीडित महिलेने फिर्याद देताना जबाबात आठ जणांची नावे नमूद केली. त्यातील सात जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनुप मोरे याचा आरोपींच्या नावामध्ये समावेश का केला नाही, अशी विचारणा फिर्यादी महिलेने केली. त्यानंतर पोलिसांनी अनुप मोरे याच्या नावाचा आरोपींमध्ये समावेश केला. अनावधानाने अनुप मोरे याचे नाव राहून गेले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Web Summary : BJP's Anup More faces charges after a female party worker alleged assault and death threats in Chinchwad. Police initially omitted More's name but later included him in the FIR following the victim's complaint. Seven others are also booked.
Web Summary : भाजपा के अनुप मोरे पर महिला कार्यकर्ता ने मारपीट और जान से मारने की धमकी का आरोप लगाया। पुलिस ने पहले मोरे का नाम नहीं लिखा, लेकिन बाद में प्राथमिकी में शामिल किया। सात अन्य पर भी मामला दर्ज।