मोरगाव वीज वितरण कार्यालयाचा मनमानी कारभार; ग्राहक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:56 IST2025-08-03T12:55:16+5:302025-08-03T12:56:55+5:30
मोरगाव हे अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र असून, या ठिकाणी आणि परिसरातील १० ते १५ गावांना वीजपुरवठा नियंत्रित करण्यासाठी दोन सब स्टेशन कार्यान्वित आहेत.

मोरगाव वीज वितरण कार्यालयाचा मनमानी कारभार; ग्राहक त्रस्त
सुपे : बारामती तालुक्यातील मोरगाव वीज वितरण कार्यालय सध्या मनमानी कारभारामुळे चर्चेत आहे. या कार्यालयांतर्गत दोन सब स्टेशन कार्यरत असून, येथील दूरध्वनी संच आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल जाणीवपूर्वक बंद ठेवले जात असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांना माहिती मिळत नाही. यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मोरगाव हे अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र असून, या ठिकाणी आणि परिसरातील १० ते १५ गावांना वीजपुरवठा नियंत्रित करण्यासाठी दोन सब स्टेशन कार्यान्वित आहेत. यापैकी काही गावांना मुर्टी येथून, तर काही गावांना मोरगाव येथील सब स्टेशनमधून वीजपुरवठा केला जातो. या ठिकाणी २४ तास कर्मचारी कार्यरत असतात. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा लोड शेडिंगच्या वेळी ग्राहकांना माहिती देण्याऐवजी कर्मचारी जाणीवपूर्वक मोबाईल बंद करत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.
माहिती न देण्याचे धोरण
वीज वितरण कंपनीच्या धोरणानुसार, वीजपुरवठा खंडित होणार असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत तो बंद केल्यास ग्राहकांना भ्रमणध्वनीद्वारे किंवा मेसेजद्वारे माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, मोरगाव परिसरात ही माहिती ग्राहकांना दिली जात नाही. येथे अनेकदा पूर्वनियोजित नसलेले लोड शेडिंग केले जाते. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत लाईनमन, शाखाधिकारी किंवा वायरमन सब स्टेशनमधील वीजपुरवठा खंडित करतात. अशा वेळी ग्राहकांना माहिती मिळणे हा त्यांचा हक्क आहे. माहितीअभावी ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
या संदर्भात बारामती तालुक्यातील अनेक सब स्टेशनवरील अधिकृत फोन उचलले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत बारामती जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत ग्राहकांचा त्रास कमी होण्याची शक्यता नाही. याबाबत गंभीर दखल घ्यावी, अन्यथा नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.