गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! घरगुती गणरायाला चिंचवडमध्ये निरोप 

By विश्वास मोरे | Updated: September 6, 2025 20:23 IST2025-09-06T20:22:22+5:302025-09-06T20:23:35+5:30

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिला. गुलाल विरहित आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सवावर भर दिला आहे. 

Pune Ganpati Festival Farewell to the household Ganesha in Chinchwad | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! घरगुती गणरायाला चिंचवडमध्ये निरोप 

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! घरगुती गणरायाला चिंचवडमध्ये निरोप 

पिंपरी: "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..." असा जयघोष करत अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिला. गुलाल विरहित आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सवावर भर दिला आहे. 

गेले दहा दिवस शहरातील वातावरण गणेशमय झाले होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आज सकाळपासूनच घरगुती गणरायाचे विसर्जन केले जात होते. पवना नदी तीरावरील चिंचवड येथील विसर्जन घाटावर कृत्रिम हौद निर्माण केले होते. त्या ठिकाणी येऊन गणेश भक्त विसर्जन करत होते. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने मूर्ती दान ही स्वीकारले जात होते. दुपारी एक नंतर घाटावरील गर्दी वाढू लागली. सायंकाळी साडेसहापर्यंत मोठ्या प्रमाणावर घरगुती गणरायाचे विसर्जन करण्यात आले. 

चिंचवडच्या मिरवणुकीची तयारी 

गणेशोत्सवा चिंचवडची मिरवणूक लक्षवेधी असते. चिंचवड गावातील चापेकर चौकामध्ये सहा रस्ते येतात. या सर्व मार्गावरून मिरवणुका चाफेकर चौकात येऊन तिथून जकात नाका मार्गे पवना नदी घाटावर जातात. या ठिकाणी महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सज्जता ठेवण्यात आली आहे. महापालिका आणि पोलिसांच्या वतीने चौकामध्ये स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे स्वागत करण्यात येत होते.  त्याचबरोबर या मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष यांच्यावतीने ही या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कक्ष उभारले आले आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून चौकात वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता पोलिसांच्या वतीने घेण्यात आली आहे. त्याचबरोबर पवना नदीचे प्रदूषण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे नदी घाटावर बॅरिकेटिंग करण्यात आली आहे. घाटावरच निर्माल्य  कुंड ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणी निर्माल्य स्वीकारले जात आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन केले आहे. 
 



पावसाची उघडीप गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित !

अधून  मधून हलक्या सरी बरसत असले तरी विसर्जनाच्या दिवशी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे दिसून आले. सायंकाळच्या सुमारास कुटुंबातील अबाल वृद्धाचे सर्व सदस्य गणरायाला निरोप देण्यासाठी घाटावर येत असल्याचे दिसून आले. चिंचवडची मिरवणूक लक्षवेधी असते.  मात्र अजून ही मिरवणूक सुरू झालेली नाही. एक-दोन छोटी गणेश मंडळ विसर्जनासाठी येत आहेत. चिंचवड परिसरातील मान्यवर गणेश मंडळांची विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असल्याची दिसून आले. मंडळांनी भव्य असे देखावे सादर करण्याचे नियोजन केले आहे.

Web Title: Pune Ganpati Festival Farewell to the household Ganesha in Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.