पिंपरी - तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग)चे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांच्यावर अज्ञात महिलेने जादूटोण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, गरुड यांनी पोलीस संरक्षणाची मागणी करत तळेगाव पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे.गरुड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "मी समाजासाठी व इनाम जमीन प्रकरणातील जुन्या केसेस पुन्हा सुरू केल्या आहेत. त्यामुळे रागातून माझ्या राहत्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला. ही घटना मंगळवार, २९ जुलैला रात्री १० ते १०.३० च्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला काष्ठ्या रंगाची साडी परिधान करून घराच्या गेटमध्ये येते, व हळदी-कुंकू लावलेला लिंबू व इतर वस्तू गाडीवर फेकून पळून जाते, असे स्पष्ट दिसून येते.
तसेच कमल भेगडे व तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा अशीही विनंती अर्जात करण्यात आली आहे. भविष्यात माझ्या किंवा कुटुंबियांच्या जीवाला काही झाले, तर कमल भेगडे व तिच्या कुटुंबास जबाबदार धरावे असेही गरुड यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.