व्हिडीओ, फोटो टाकून दहशत निर्माण करणाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दाखवला हिसका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 15:42 IST2023-03-18T15:41:22+5:302023-03-18T15:42:46+5:30
दोन तरुण औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर कारचालकांच्या समोर हुल्लडबाजी करत होते...

व्हिडीओ, फोटो टाकून दहशत निर्माण करणाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दाखवला हिसका
पिंपरी : फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांवर आणि व्हिडीओ, फोटो टाकून दहशत निर्माण करणारे भाई आपण सर्वजण पाहतोच. त्याचबरोबर रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे भाईंचीही शहर परिसरात कमी नाही. याचा त्रास सामान्य नागरिक, महिला यांना जास्त होतो. असेच दोन तरुण औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर कारचालकांच्या समोर हुल्लडबाजी करत होते. कारमधील तरुणींने त्यांचा व्हिडीओ काढून पिंपरी-चिंचवडपोलिसांना टॅग केला. त्याची दखल घेत पिंपरी-चिंचवडपोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
औंध-रावेत बीआरटी रस्त्याने जात असतांना एका कुटुंबाला हुल्लडबाज तरुणांनी त्रास दिला. त्यांचा व्हिडीओ त्या कुटुंबांनी चित्रित करून ट्विटरवर टाकून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पेजला टॅग करून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्वरित प्रतिसाद देत त्यांच्यावर कारवाई केली. कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी पोस्टकर्त्यांना टॅग करून माहिती दिली. पोलिसांच्या या पोस्टवर सोशल मीडियाकर्मींनी चांगले काम केल्याबद्दल कौतुकाची थाप दिली. तसेच असे चांगले काम पोलिसांकडून अपेक्षित असल्याचेही म्हटले.