नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीएतर्फे अनधिकृत गाळ्यांवर कारवाई
By नारायण बडगुजर | Updated: December 23, 2024 17:03 IST2024-12-23T17:03:05+5:302024-12-23T17:03:52+5:30
रहदारीचा विचार करुन संबंधितांसह इतरांनी सुद्धा अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन पीएमआरडीएच्या अधिकारी, कर्मचारी यांनी केले.

नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीएतर्फे अनधिकृत गाळ्यांवर कारवाई
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुण्यातील नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सोमवारी (दि.२३) सकाळी सात वाजल्यापासून कारवाई करण्यात आली. यात अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकण्यात आले. रहदारीचा विचार करुन संबंधितांसह इतरांनी सुद्धा अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन पीएमआरडीएच्या अधिकारी, कर्मचारी यांनी केले.
पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या वतीने गत काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असून संबंधित बांधकामे हटविण्यात येत आहेत. नवले ब्रिज भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीए पथकाने सोमवारी दिलीप दादा नवले, वैशाली दांगड, सारंग नवले, अतुल चाकणकर, विकास नाना दांगड यांच्यासह इतरांनी अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकले. पुणे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन म्हस्के, रवींद्र रांजणे, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता विष्णू आवाड, गणेश जाधव, अभिनव लोंढे यांच्यासह पोलिस कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगसह बांधकामांचा सर्वे सुरु असून निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांनी परवानगी घेवूनच बांधकामे करावीत, यासह चालू असलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. नवले ब्रिज भागातील या कारवाईमुळे निश्चितच वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.