सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनाच्या 'व्हायरस'ने हिंजवडी आयटीनगरी 'हायजॅक'
By विश्वास मोरे | Updated: July 29, 2025 10:38 IST2025-07-29T10:37:25+5:302025-07-29T10:38:07+5:30
जागतिक नकाशावर आयटी हब म्हणून लौकिक हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे झालेले दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनामुळे उद्योग स्थलांतराची वेळ आली आहे.

सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनाच्या 'व्हायरस'ने हिंजवडी आयटीनगरी 'हायजॅक'
- डॉ. विश्वास मोरे
पिंपरी : जागतिक नकाशावर आयटी हब म्हणून लौकिक हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे झालेले दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनामुळे उद्योग स्थलांतराची वेळ आली आहे. वाहतूक प्रश्नांबरोबरच, दळण-वळण, रस्ते, पाणी, आरोग्य, वैद्यकीय अशा अपुऱ्या मूलभूत सुविधांना नागरिक आणि कामगार कंपन्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तयार केलेला कृती आराखडा सत्यात साकारणे गरजेचे आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीची अर्थात आयटी पार्कची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्यावेळी पाच टप्प्यात याभागांचा विकास करण्याचे नियोजन केले होते. टप्पा एक, दोन आणि तीनमध्ये विकास झाला आहे. याठिकाणी हिंजवडी, माण, मारुंजी अशा विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एलॲडटी, बिर्ला सॉफ्टवेअर, इन्फोटेक कार्पोरेट, थिंक स्मार्ट, ई झेस्ट, आयबीएम, फॉक्स वेगन आयटी पार्क, टेलस्ट्रा यांच्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांनी एकापाठोपाठ प्रकल्प सुरू केले. मात्र, आयटीनगरी आल्याने भूमिहीन होण्याची भावना झाल्याने टप्पा चार आणि पाचला स्थानिकांनी विरोध झाल्याने विस्तार थांबला आहे. सध्या आजमितीस तिथे चार ते साडेचार लाख संगणक अभियंते आणि कामगारांना रोजगार मिळाला आहे. मात्र, मुलभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या त्रस्त आहेत.
दोन बैठका झाल्या, केवळ टोलवाटोलवी
हिंजवडी नागरी समस्यांवरून प्रशासकीय पातळीवर केवळ बैठकांचा सिलसिला सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला आले की अधिकारी कान देऊन ऐकतात. माना डोलवितात. प्रत्यक्षात येरे माझ्या मागल्या सुरू आहे. पीएमआरडीए एमआयडीसीकडे, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन हे एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत.
आयटी पार्कच्या उभारणीत नेते शरद पवार, माजी खासदार नाना नवले यांचे योगदान मोलाचे आहे. पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी या भागाचे नेतृत्व केले आहे. मात्र, सत्ता असतानाही १५ वर्ष येथील प्रश्नांकडे लक्ष दिले गेले नाही. आता महायुतीच्या काळात दोन बैठका झाल्या, जुजबी प्रश्न सोडविण्यापलीकडे काही होत नसल्याचे वास्तव आहे. टोलवाटोलवी सुरू आहे.
कशामुळे होतेय आयटी कंपन्यांचे स्थलांतर ?
आशिया खंडातील एकमेव आयटीनगरी अशी ओळख यातून तयार झाली. मात्र, येथील प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे, प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आजवर तब्बल ३७ कंपन्यांनी बंगळुरू आणि इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे.
उद्योजकांच्या अपेक्षा
हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने २० मुद्द्यांसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यापैकी काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत, तर काही प्रलंबित आहेत. वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्यासाठी वाहतूक नियोजनासाठी अधिक मनुष्यबळ, मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करून सेवा सुरू करावी. हिंजवडी येथील शिवाजी चौक ते स्मशानभूमीपर्यंतच्या ९०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण, बंगळुरू महामार्गावर भुयारी मार्ग आवश्यकता, हिंजवडीत येणारे एमआयडीसी बाहेरील रस्ते रुंदीकरण करावे, पदपथ निर्माण करावेत. नांदेपर्यंत रस्त्याचे काम, बाणेर भुयारी मार्ग, राधा चौक ते शेडगेवस्तीपर्यंतचा रस्ता रुंदीकरण.
पिंपरी चिंचवडमधून येथे मोठ्या प्रमाणावर अभियंते येतात. शहरातील वाकड, पिंपळे सौदागर नाशिक फाटा जाण्यासाठी मेट्रो मार्ग. गावठाणांमध्ये निर्माण होणारा कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे. मूलभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे.