Pimpri Chinchwad : महापालिकेतील २० प्रभागांमध्ये आता अनुसूचित जातीचे आरक्षण
By विश्वास मोरे | Updated: October 8, 2025 12:31 IST2025-10-08T12:29:13+5:302025-10-08T12:31:54+5:30
- महापालिकेतील २० प्रभागांत अनुसूचित जातीचे आरक्षण;आता सोडतीची प्रतीक्षा : तीन प्रभागांत अनुसूचित जमातींचेही आरक्षण; चिंचवडेनगर आणि दापोडी प्रभागांमधील सर्वसाधारण गटातील इच्छुकांना फटका

Pimpri Chinchwad : महापालिकेतील २० प्रभागांमध्ये आता अनुसूचित जातीचे आरक्षण
पिंपरी : महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी निश्चित झाली. त्यामुळे आता आरक्षण सोडतीची प्रतीक्षा लागली आहे. एकूण १२८ पैकी २० प्रभागांत अनुसूचित जातीचे आरक्षण राहणार असून, त्यातील तीन प्रभागांत अनुसूचित जमातींचेही आरक्षण राहणार आहे. त्यामुळे चिंचवडेनगर आणि दापोडी प्रभागांमधील सर्वसाधारण गटातील इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. चार सदस्यीय ३२ प्रभाग आणि १२८ सदस्य असणार आहेत. आता आरक्षण सोडतीची उत्सुकता लागली आहे.
अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण त्या प्रभागातील मतदारसंख्येवर अवलंबून असते. सर्वाधिक मतदारसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण लागू होते. १२८ सदस्यांमध्ये अनुसूचित जातीची (एससी) वीस आरक्षणे, तर अनुसूचित जमातीची (एसटी) तीन आरक्षणे असणार आहेत.
तीन प्रभागांत एससी आणि एसटीची आरक्षणे
प्रभाग क्रमांक ४ (दिघी), २९ (पिंपळे गुरव) आणि प्रभाग क्रमांक ३० (दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी) येथे अनुसूचित जाती आणि जमाती या दोन्ही प्रवर्गांची आरक्षणे असतील.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित वीस प्रभाग (कंसात प्रभाग क्रमांक)
मोशी (३), दिघी (४), इंद्रायणीनगर (८), नेहरूनगर (९), संभाजीनगर (१०), पूर्णानगर (११), यमुनानगर (१३), रावेत (१६), चिंचवडेनगर (१७), श्रीधरनगर, भाटनगर (१९), संत तुकारामनगर (२०), पिंपरी (२१), थेरगाव (२३), ताथवडे, वाकड (२५), पिंपळे निलख (२६), रहाटणी (२७), पिंपळे गुरव (२९), दापोडी, कासारवाडी (३०), नवी सांगवी, उरो रुग्णालय (३१) आणि जुनी सांगवी (३२).
तीन प्रभाग फोडल्याने कोणाला फायदा, कोणाला फटका?
प्रभाग क्रमांक २४ पदमजी पेपर मिल हा प्रभाग फोडल्यामुळे यातील अनुसूचित जातीचे आरक्षण कमी झाले. ते आरक्षण प्रभाग क्रमांक १६ चिंचवडेनगरमध्ये गेले आहे. शिवसेना शिंदे गटाने केलेल्या बदलाचा फटका चिंचवडमध्ये भाजपला बसणार आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये यापूर्वी चारही जागा खुल्या आणि ओबीसी गटासाठी होत्या. आता यामध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण आहे. या प्रभागातील पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे यांना फटका बसणार आहे. भाजपने प्रभाग सहा (धावडे वस्ती) फोडल्याने येथील एसटीचे आरक्षण कमी झाले आहे. ते आरक्षण दापोडीतील प्रभाग ३०मध्ये जाणार आहे. त्यामुळे तेथील सर्वसाधारण गटातील काटे बंधूंची कोंडी होणार आहे.