कोण ठरणार वस्ताद..? भोसरीत यंदा भाजपसमोर अंतर्गत आव्हाने, तर राष्ट्रवादी-शिवसेनेस ताकद दाखविण्याची संधी
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 6, 2025 12:49 IST2025-11-06T12:21:54+5:302025-11-06T12:49:41+5:30
- पाच वर्षांत मतदारसंघाला महापालिकेतील वजनदार पदांवर संधी; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; सत्तासमीकरणांतील उलथापालथीने स्थानिक पातळीवरही नवीन गणित

कोण ठरणार वस्ताद..? भोसरीत यंदा भाजपसमोर अंतर्गत आव्हाने, तर राष्ट्रवादी-शिवसेनेस ताकद दाखविण्याची संधी
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांत यंदाची महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी येथील १४ प्रभागांतून ३३ नगरसेवक निवडून आणले होते. तेव्हा रवी लांडगे यांच्या रूपाने भाजपला बिनविरोध नगरसेवक मिळाला होता. पाच वर्षांत दोन महापौर, दोन स्थायी समिती अध्यक्ष, तसेच गटनेतेपदही भोसरीला मिळाले होते. आता भाजपसमोर अंतर्गत आव्हाने, तर राष्ट्रवादी-शिवसेनेस ताकद दाखविण्याची संधी आहे.
महायुतीतील पक्ष वेगवेगळे लढणार असल्याचे संकेत आहेत. त्यात महाविकास आघाडीने तगडे उमेदवार उभे केले तर ही लढत चुरशीची बनेल. कारण शिवसेना (उद्धवसेना) आणि काँग्रेसकडे भोसरी परिसरात अल्पसंख्याक आणि कामगारवर्गीय मतदारांचा स्थिर आधार आहे. २०१७ पूर्वीची स्थिती पाहता राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना या भागात चांगला जनाधार होता. मात्र, भाजपने त्या काळात संघटनशक्ती आणि सत्तेच्या बळावर तो जनाधार ओढून घेतला; परंतु आता राज्यातील फुटीनंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकत्र येत आहेत.
चौरंगी लढतीची शक्यता
राज्यातील सत्तासमीकरणांतील उलथापालथीने स्थानिक पातळीवरही नवीन गणित तयार झाले आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने राष्ट्रवादीची ताकद पुन्हा वाढली आहे. याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मंगला कदम, योगेश बहल, अजित गव्हाणे, श्याम लांडे, राहुल भोसले हे दिग्गज आहेत. शरद पवार गटातील सुलक्षणा धर याही आहेत. राष्ट्रवादीतील दत्ता साने यांचे पुत्र यश साने आणि शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख हेही मैदानात उतरू पाहत आहेत. भाजपच्या सीमा सावळे, एकनाथ पवार, विलास मडिगेरी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुलभा उबाळे आता एकनाथ शिंदे यांच्या गटाशी जोडल्या गेल्या आहेत. भाजपचे रवी लांडगे यांनी उद्धवसेना गटाची मशाल हाती घेतली आहे. तेही परिसरात प्रभावी भूमिका बजावत आहेत. परिणामी, भोसरीत भाजप, शिवसेना (शिंदेसेना), अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
पारंपरिक मतदारांपेक्षा नेत्यांची कामगिरी महत्त्वाची
प्रभाग एक आणि १२ मध्ये किरकोळ बदल केले आहेत. त्यात प्रभाग २० मधील काही भाग भोसरी, तर काही भाग पिंपरी मतदारसंघात आहेत. त्यामुळे नवमतदार महत्त्वाचा घटक ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांत भोसरी, मोशी, चऱ्होली, कुदळवाडी या भागांत नव्याने राहायला आलेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या नवमतदारांना जुनी राजकीय समीकरणे फारशी माहिती नाहीत. त्यांना पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत गरजांचीच जास्त काळजी आहे. त्यामुळे मतदारसंघातील पारंपरिक मतदारांपेक्षा नेत्यांची कामगिरी आणि प्रतिमा हाच निर्णायक घटक ठरणार आहे.
कुदळवाडीतील कारवाई कोणाच्या पथ्यावर?
भोसरी मतदारसंघातील कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, नदीपात्रातील ३२ बंगल्यांवरील कारवाई कोणाच्या पथ्यावर पडेल, याविषयी उलटसुलट चर्चा आहे. आमदार लांडगे यांच्यासमोर संघटन बांधून ठेवण्याचे आव्हान आहे, तर अजित गव्हाणे व राष्ट्रवादीला नव्याने उभारणी करायची आहे. महाविकास आघाडीलाही स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची हीच संधी आहे.
भोसरी मतदारसंघात २०१७ मध्ये कोणाकडे किती सदस्यसंख्या :
भाजप : ३१
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : १८
शिवसेना : १
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : २
मनसे : १
अपक्ष : १
मतदारसंघातील मतदारसंख्या
पुरुष - महिला - इतर - एकूण मतदारसंख्या
३३५७५७ - २८८२९४ - १०१ - ६२४१५२