वीस दिवसांत १९० कोटींचे ‘टार्गेट’; महापालिका कर संकलन विभागासमोर आव्हान

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 12, 2025 11:34 IST2025-03-12T11:32:41+5:302025-03-12T11:34:14+5:30

- एक हजार कोटींचे उद्दिष्ट, आतापर्यंत ८१० कोटींचा मालमत्ताकर वसूल करण्यात आला

pimpri chinchwad news Target of 190 crores in twenty days Challenge before the Municipal Tax Collection Department | वीस दिवसांत १९० कोटींचे ‘टार्गेट’; महापालिका कर संकलन विभागासमोर आव्हान

वीस दिवसांत १९० कोटींचे ‘टार्गेट’; महापालिका कर संकलन विभागासमोर आव्हान

पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून आतापर्यंत ८१० कोटींचा मालमत्ताकर वसूल करण्यात आला आहे. या विभागास १ हजार कोटीचे ‘टार्गेट’ आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत म्हणजे केवळ २० दिवसांत १९० कोटी रुपये वसुलीचे आव्हान या विभागासमोर आहे.

कर संकलन विभागाने मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्या सील करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ७८ हजार ६५८ मालमत्ताधारकांनी ८१० कोटी रुपयांचा भरणा केला आहे. कर संकलन विभागास १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे.

त्यामुळे उर्वरित २० दिवसांत त्या विभागास तब्बल १९० कोटींच्या वसुलीसाठी कारवाई मोहीम तीव्र करावी लागणार आहे. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना वसुलीचे लक्ष्य दिले आहे.
 
वाकडमधून सर्वांधिक १०० कोटींचा मालमत्ताकर

वाकड विभागीय कार्यालयात सर्वाधिक ९९ कोटी ८३ लाखांचा मालमत्ताकर जमा झाला आहे. थेरगाव कार्यालयात ७४ कोटी १६ लाख रुपये आणि चिखली कार्यालयात ७३ कोटी ५६ लाखांचा भरणा झाला आहे. भोसरीत ५८ कोटी २ लाख, सांगवीत ५४ कोटी ६८ लाख, चिंचवडमध्ये ५३ कोटी १४ लाख, पिंपरीत ४९ कोटी ७५ लाख, किवळेत ४८ कोटी ९६ लाख, मोशीत ४८ कोटी ४ लाखांचा कर जमा झाला आहे. आकुर्डीत ३९ कोटी ६७ लाख, महापालिका भवनात ३८ कोटी ८६ लाख, कस्पटे वस्तीमध्ये ३६ कोटी ७९ लाख, फुगेवाडी, दापोडी-२६ कोटी ३९ लाख, चऱ्होली-२५ कोटी ६ लाख, दिघी, बोपखेलमध्ये २५ कोटी २१ लाखांचा कराचा भरणा झाला आहे. सर्वांत कमी तळवडेत २१ कोटी ११ लाख, निगडी-प्राधिकरणात १८ कोटी ३ लाख आणि पिंपरी कॅम्पात ६ कोटी ९० लाखांचा भरणा झाला आहे. एकूण ८१० कोटी रुपयांचा भरणा झाला आहे.
 
ऑनलाइनने सर्वांधिक ५५१ कोटी ७१ लाख

मालमत्ताकराची बिले ऑनलाइन भरण्यास गेल्या दहा वर्षांपासून प्रतिसाद वाढत आहे. स्मार्ट मोबाइल, इंटरनेटमुळे ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन तसेच, ईडीसी, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस या माध्यमातून एकूण ५५१ कोटी ७१ लाख रुपयांचा भरणा मालमत्ताधारकांनी केला आहे. रोखीने ८१ कोटी ४३ लाख रुपये जमा झाले आहेत. धनादेशाद्वारे १०२ कोटी १३ लाख आणि डीडीद्वारे ५ कोटी ४३ लाख रुपये कर संकलन विभागाकडे जमा झाले आहेत.
 
कर वसुलीची सद्यस्थिती

एकूण मालमत्ताधारक - ६ लाख ३५ हजार
कर भरणारे - ४ लाख ७८ हजार ६५८
जमा कर- ७९७ कोटी १९ लाख ३८ हजार ९२६
कर न भरणारे- १ लाख ५६ हजार ३४२

कर वसुली मोहीम तीव्र
थकबाकीदारांकडून थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकर वसुलीसाठी कारवाई मोहीम तीव्र करण्यात आली आहे. ८७७ मालमत्ता सील केल्या आहेत. त्यापैकी ४३८ थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यातील काही जणांनी बिलाचा भरणा केला आहे. मुदतीमध्ये थकीत बिल न भरल्यास त्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.  - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका

Web Title: pimpri chinchwad news Target of 190 crores in twenty days Challenge before the Municipal Tax Collection Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.