जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही - डॉ. सदानंद मोरे
By विश्वास मोरे | Updated: March 9, 2025 19:11 IST2025-03-09T19:05:43+5:302025-03-09T19:11:37+5:30
उत्तरपेशवाई सारखी महाराष्ट्रात स्थिती

जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आले नाही - डॉ. सदानंद मोरे
पिंपरी: पुढील १०० वर्षात मराठे जगात पहिल्या क्रमांकावर जातील, असे इतिहास संशोधक जदुनाथ सरकार यांनी सांगितले होते. मात्र तसे झाले नाही. कारण जातीयवादामुळे महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करता आलेले नाही. आजवर इतिहासात सर्व जाती एकत्र आल्या म्हणून विजय मिळाले. जातींचे ऐक्य नष्ट झाले कि राज्य संपले. उत्तरपेशवाई सारखी महाराष्ट्रात स्थिती आज आहे. जोपर्यंत आपण आयडियॉलॉजीला आपली आयडेंटिटी करत नाही, तोपर्यंत आपण जगात अग्रेसर होऊ शकत नाही. सर्वांना एकत्रित घेणारा महाराष्ट्र धर्म हीच आपली आयडियॉलॉजी असली पाहिजे, असे मत अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी मनसेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे यांचा सन्मान केला. त्यानंतर 'महाराष्ट्र काल आज आणि उद्या' यावर प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्याख्यान दिले.
रामाचा पहिला राज्याभिषेक नाशिकमध्ये
डॉ सदानंद मोरे म्हणाले, 'मी आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच भूतकाळ आणि भविष्य आणि वर्तमान काय याबाबत बोलणार आहे. महाराष्ट्राशी माझा संबंध लहानपणापासून आला. तेव्हापासून माझा अभ्यास सुरू आहे. आचार्य अत्रे, अनेक संघटना, माझा वावर त्यात होता. पण मी राजकारणापासून अलिप्त राहिलो. मी ऐकले नाशिक शहर हे राज ठाकरे यांचे आवडत ठिकाण आहे. रामायणाचा संबंध नाशिकशी आहे. भरत आणि श्रीराम यांची भेट तिथं झाली. भरताने रामाचा पहिला राज्याभिषेक नाशिकमध्ये केला ही बाब नाशिकच्या लोकांना माहिती नाही. त्यानंतर अयोध्येला राज्याभिषेक झाला. ब्रिटिश अधिकारी हंटर यांनी दिल्ली ऐवजी भारताची राजधानी नाशिक असायला हवी होती.'
महाराष्ट्र धर्म हीच आपली आयडियॉलॉजी
डॉ मोरे म्हणाले, ब्रिटिश काळात महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन होऊ लागले. जदुनाथ सरकारने औरंगजेबावर पुस्तक लिहिले. त्यात वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव येत होते. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले सगळे सगळे. त्यात मराठा, दलीत असे सगळे त्यात आले. इतिहासात महाराष्ट्राचा दृष्टिकोन व्यापक राहिलेला आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला, अशी आपण यशवंतराव चव्हाण यांची आठवण काढतो. असे अनेक प्रसंग आहेत.'