पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीत सत्ताधारी- विरोधकांची अळीमिळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 21:33 IST2021-09-08T21:23:51+5:302021-09-08T21:33:52+5:30
तीन आठवड्यापूर्वी महापालिका मुख्यालयात एसीबीने धाड टाकली होती. स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना अटक केली होती. त्यावरून विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने भाजपवर टीका केली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीत सत्ताधारी- विरोधकांची अळीमिळी
पिंपरी : ‘‘स्थायी समिती बरखास्त करा, आमचे सदस्य सभेत सहभागी होणार नाहीत, असे विधान करणारे विरोधीपक्षातील सदस्य स्थायी समिती सभेत सहभागी झाले होते. त्यातुन भाजप,राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य असणाऱ्या स्थायी समितीत अळीमिळी दिसून आली.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची सभा ऑनलाइन झाली. अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. विषयपत्रिकेवरील सर्वच म्हणजेच २९ विषयांना मान्यता दिली. याशिवाय आयत्यावेळच्या सहा अशा तब्बल ४३ कोटी ९८ लाख ५२ हजार २०२ रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली.
तीन आठवड्यापूर्वी महापालिका मुख्यालयात एसीबीने धाड टाकली होती. स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना अटक केली होती. त्यावरून विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने भाजपवर टीका केली होती.
............
विषयपत्रांचा अभ्यास नाही
स्थायी समिती बरखास्त करा, अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर दोन बैठका राष्ट्रवादीचे चार सदस्य उपस्थित नव्हते. मात्र, आजपासून विरोधक स्थायी समिती बैठकीत सहभागी होऊ लागले आहेत. एकाही विषयाला विरोध दर्शविला नाही. त्यावर आम्हाला सभेत सहभागी होण्याचा दुपारी उशिरा निरोप मिळाला. आम्हाला विषयपत्र वाचता आले नाही. त्यामुळे विषयाला विरोध करता आला नसल्याचे अजब स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या स्थायीतील सदस्यांनी दिले. त्याचबरोबर शिवसेनेच्या सदस्यानेही सभेत सहभाग घेतला.
..........
आजच्या सभेत सर्वपक्षीय सदस्य सहभागी झाले होते. पाणी आरोग्य, वैद्यकीय आदी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. मते मांडली. पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. सणासुदीच्या काळात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची सूचना प्रशासनाला केली. डेग्यूबाबत उपाययोजना कराव्यात. दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांना दिले आहेत.
-नितीन लांडगे, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका
.....................
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी नैतिकता दाखविली नाही. शहराच्या विकासासाठी प्रश्न मांडण्यासाठी, तसेच चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठी सभागृहात उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यामुळे चुकीच्या कामांना विरोध असेल. आजही सल्लागार नियुक्तीला विरोध केला.
-राजू मिसाळ, विरोधीपक्षनेते